कल्याण, डोंबिवलीतील ‘फेरीवाला हटाव’ पथकाकडून कारवाईच नाही
कल्याण, डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील स्कायवॉक गेल्या दोन महिन्यांपासून फेरीवाल्यांनी गजबजून गेले आहेत. दोन्ही बाजूला फेरीवाले सामान मांडून बसत असल्याने पादचाऱ्यांना चालणे शक्य होत नाही. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत चालताना प्रवाशांना कसरत करावी लागते.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर सकाळी आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत फेरीवाले ठाण मांडून बसलेले असतात. पालिकेचा ग, ह प्रभाग फेरीवाले बसत असलेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर आहे. फ प्रभाग अधिकारी दीपक शिंदे, ग प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप कार्यालयात उपस्थित असतात. फेरीवाल्यांना हटविणारे कामगार पालिकेच्या आवारात बसलेले असतात. ‘निवडणुकीचे काम आहे’ या नावाखाली सध्या फेरीवाल्यांना अतिक्रमण नियंत्रण विभागाने रान मोकळे करून दिले आहे. मागील दोन वर्षे महापौर विनिता राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाले हटविण्यात आले होते. डोंबिवलीत बाजीराव अहिर आणि त्यांच्या पथकाने पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त केला होता. महापौर राणे यांचा प्रशासनावर सध्या वचक कमी झाला असल्याने बेकायदा बांधकामे, फेरीवाले यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात निवडणूक काळ असूनही एकही फेरीवाला रस्त्यावर बसत नाही. असे असताना पूर्व भागात स्कायवॉक रस्त्यावर फेरीवाले का बसत आहेत, असा प्रश्न डॉ. स्वाती गाडगीळ यांनी केला आहे. पालिकेपासून हाकेच्या अंतरावर फेरीवाले बसत आहेत. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसू देऊ नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, तरी पालिका प्रशासन त्याचे पालन करीत नाही याचे आश्चर्य वाटते, असे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले. या प्रकाराची आपण आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे तक्रार करणार आहोत, असे त्या म्हणाल्या.
फेरीवाले त्यांचे सामान समोर पसरतात आणि बाजूला सामानाची पोती घेऊन बसतात. त्यामुळे मोठी अडचण स्कायवॉकवर पाहण्यास मिळत आहे. सकाळी, संध्याकाळी स्कायवॉकवरून चालणे अवघड झाल्याने पादचारी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
निवडणूक कामासाठी कर्मचारी विविध ठिकाणी नेमणुकीवर आहेत. ते काम महत्त्वाचे असल्याने फेरीवाला हटविण्यात दुर्लक्ष होत आहे. तरीही कामगार उपलब्ध झाले की तात्काळ फेरीवाल्यांना हटवले जाते. आताही कामगार उपलब्ध झाले तर तातडीने स्कायवॉकवर पाठवून फेरीवाल्यांना हटवले जाईल. – दीपक शिंदे, प्रभाग अधिकारी, डोंबिवली