महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हय़ाच्या अध्यक्षपदी प्रा. घुमटकर यांची नुकतीच निवड झाली. या निवडीचा आनंद कोकण मराठी साहित्य परिषदेलाही झाला, त्यामुळे कोमसापच्या ठाणे शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. घुमटकर यांचे त्यांच्या कार्यालयात जाऊन अभिनंदन केले. साहित्यवर्तुळात असा दुर्मीळ योगच म्हणावा लागेल, कारण राजकीय पक्षांना कितीही नावे ठेवली तरी विरोधकांचे तोंडदेखले अभिनंदन करण्याची प्रथा राजकीय पक्षांमध्ये दिसून येते, पण तीच राजकीय प्रगल्भता साहित्य व्यवहारातील संस्थांमध्ये दिसून येईलच असे नाही. म्हणून या घटनेचे कौतुक वाटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहर आणि जिल्हय़ात महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय नाटय़ परिषद, कोकण मराठी साहित्य परिषद या साहित्य व्यवहाराशी जोडलेल्या मान्यवर संस्थांच्या शाखा गेली अनेक वर्षे सुरू आहेत. त्या काय काम करतात हा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो, पण शाखा आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा गेले वर्षभर जिवंत असल्याचे वाटते आहे. छोटे का होईनात कार्यक्रम सुरू आहेत. तसे मसाप गेली अनेक वर्षे काय करते असे दिसून आलेले नाही. बहुधा त्यासाठीच घुमटकर सरांवर अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली असावी. प्रा. घुमटकर हे एक करारी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्ष करून मसाप काही तरी करू इच्छित असावी. येणाऱ्या काळात ठाणेकरांना ते पाहायला मिळेलच.

कोमसाप आणि मसाप ज्यामध्ये सहभागी आहे त्या अखिल भारतीय साहित्य महामंडळामध्ये तात्त्विक वाद आहेत.  महामंडळ कोमसापला आपल्यामध्ये सामावून घेण्यास तयार नाही, तर कोमसाप महामंडळाला आव्हान देत महामंडळ म्हणजेच सर्व काही असे मानायला तयार नाही. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घोषित झाल्यावर वादाचे मुद्दे समोर येतात आणि महामंडळाला कोमसापचे अध्यक्ष झोडून काढतात हे दरवर्षी साहित्य रसिक अनुभवतात; पण असे सारे असताना घुमटकर सर यांची निवड मसापने करताच कोमसापच्या ठाणे शाखेला आनंद व्हावा हे नवल वाटावेसे आहेच ना. एक तर या दोन संस्था जरी साहित्य व्यवहाराशी जोडलेल्या असल्या तरी त्यामधील सर्व सदस्य हे दोन्ही संस्थांमध्ये सभासद आहेतच असे नाही. दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन काही कार्यक्रम केल्याचे ऐकिवात नाही.

या दोन्ही संस्था आणि ठाण्यातील वाचनालये हेही कधी एकत्र आल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे भविष्यात जर आता या दोन्ही संस्था वाद बाजूला ठेवून एकत्र आल्या आणि ठाण्यात एखादा कार्यक्रम एकत्र राबवतील असे दिसून आले तर नवल वाटणार नाही. अर्थात हा बदल चांगला आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात असे साहित्यिक सोशल इंजिनीअरिंग होणार असेल तर ठाणेकरांच्या फायद्याचेच आहे, कारण त्यातून एक चांगली चळवळ उभी राहू शकते. त्यामुळे त्याचे स्वागतच करायला हवे, कारण मराठी साहित्यात असे अनेक वाद आहेत. लेखक, कवी आणि साहित्यिकांमधील राजकारण हा विषय पीएचडीचाही होऊ  शकतो, त्यामुळे त्यावर इथे फार भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

अर्थात कुठल्याही संस्थांमध्ये असलेले मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवून एकत्र आल्या तर आनंदच होईल. सामान्य रसिकाला त्याचा फायदाच होईल. त्यामुळे ठाण्यात या दोन साहित्य संस्थांनी दाखवलेली ही राजकीय प्रगल्भता दखल घेण्याजोगी वाटली. एक तर मतभेद बाजूला ठेवून हे घडत असेल किंवा साहित्यवर्तुळाचा पूर्वइतिहास माहीत नसलेल्यांच्या हाती संस्था गेल्यामुळेही घडत असू शकते, पण काय हरकत आहे. वादाऐवजी संवाद वाढत असेल तर.. तोच संवाद नाटय़ परिषदेशी वाढावा.. तोच संवाद वाचनालये आणि नव्याने सुरू झालेल्या साहित्यकट्टय़ांशीही वाढावा अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social engineering by literary organizations in thane
First published on: 17-06-2016 at 01:44 IST