लवकरच अंमलबजावणी

लोकसत्ता प्रतिनिधी

विरार : वसई विरार परिसरात  बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, ‘लोकसत्ता’च्या या बातमीची दखल महापालिकेने घेतली आहे. लवकरच महानगर पालिका या बोगस डॉक्टरांवर कारवाई करणार आहे.  यासाठी विशेष मोहीम पालिका राबविणार आहे.

कोविड १९ काळात पालिकेकडून बोगस डॉक्टरांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने शहरात बोगस डॉक्टरांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली. पालिकेची कोणतीही कारवाई होत नसल्याने हे डॉक्टर खेडय़ा पाडय़ात. चाळीत बिनदिक्कत आपले दुकान थाटत होते. साधारण दवाखाना सुरु करून रुग्णांवर उपचार करून त्यांच्या आरोग्याशी खेळत होते. या संदर्भात लोकसत्ता ने सातत्याने वृत्तांकन केले आहे. असे असतानाही पालिका प्रशासन केवळ मनुष्यबळ आणि पोलीस संरक्षण देत मिळत नसल्याने कारवाई करत नव्हती. पालिकेने महापलिका स्थापनेपासून केवळ ६१ डॉक्टरांवर कारवाई केली आहे.

शहरात शेकडो डॉक्टर विना परवाना आपले दवाखाने चालवत आहेत. पालिकेत दवाखाने नोंदणी सक्तीची नसल्यामुळे, तसेच नोंदणी प्रक्रिया मोठी  खर्चिक बाब असून त्यानंतर सुद्धा जैविक कचरा आणि इतर सर्व माहिती पालिकेला द्यावी लागत असल्याने अनेक डॉक्टर पालिकेकडे आपल्या दवाखान्याची नोंदणी करत नाहीत.

यामुळे अनेक बोगस डॉक्टरांचे फावले जात आहे. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी बोगस डॉक्टरांचा विषय गांभीर्याने घेतला असून लवकरच अशा डॉक्टरांवर पालिका कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ कोविड काळात पालिका आरोग्य कर्मचारी मर्यादेपेक्षा अधिक व्यस्त असल्याने ही कारवाई मंदावली होती. पण आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा पालिका सक्रीय होऊन कारवाई करणार आहे.