ठाणे : ज्याप्रमाणे विमानतळ तयार झाले आहेत. त्याप्रमाणे राज्य परिवहन सेवेचे आगार देखील तयार केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली. एसटीचा चेहरा-मोहरा बदलायचा आहे. एसटीमध्ये सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. राज्यातील परिवहन सेवा मला पंचतारांकित करायची आहे. एसटी प्रवासी सुखावतील अशी सुविधा येथे द्यायची आहे असे शिंदे म्हणाले. मी सर्व मंत्र्यांना थेट जनतेमध्ये जाण्यास सांगितले आहे असेही शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी खोपट बस स्थानकात तयार करण्यात आलेल्या वातानुकूलित विश्रांतीगृहाचा उद्घाटन सोहळा आणि राज्यातील आरोग्य विषयक उपक्रमांचा लोकार्पण सोहळा ठाण्यात पार पडला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

मागील वर्षी एमआयडीसीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्चून एसटीच्या १९१ बसस्थानकांच्या परिसराचे काँक्रीटीकरण करण्याचे काम आपण हाती घेतले आहे. खड्डेमुक्त बसस्थानके हा संकल्प असल्याचे शिंदे म्हणाले. प्रत्येक एसटी आगारांमध्ये वातानुकूलित, स्वच्छ आणि टापटीप असे विश्रांतीगृह निर्माण करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. खोपट येथील बसस्थानकावरील नुतनीकरण केलेल्या विश्रांतीगृहाप्रमाणे इतर बसस्थानकांमध्येही अशाच पद्धतीने विश्रांतीगृह करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आरोग्य विषयक उपक्रमाच्या लोकार्पण सोहळ्यात शिंदे म्हणाले की, मी खूप संवेदनशील व्यक्ती आहे. दुसऱ्यांच्या वेदना कमी करण्याच्या संवेदना आपल्याकडे असल्या पाहिजेत. सध्या सगळ्यात मोठी चिंता कर्करोगाची आहे. हा आजार संपला पाहिजे यासाठी शासन कटीबद्ध आहे. माझ्या गावी मोठी निसर्गसंपदा आहे. ५०० प्रकारच्या दुर्मिळ वनऔषधी आहेत. तिथे संशोधन केल्यास दुर्मिळ औषधे बनविता येतील.

अडीच वर्षांत आम्ही रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. राज्यात दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमुळे उपचार परिणामकारक होतील. नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम आमचे आहे. रुग्णाला तात्काळ उपचार मिळायला हवे असेही शिंदे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरे गावात निसर्गोपचार केंद्र – जाधव

आरोग्य विषयक उपक्रमाच्या शुभारंभास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ७० कोटी रुपयांचे निसर्गोपचार केंद्र तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. या भागात राष्ट्रीय स्तरावरील वनऔषधीसंबंधिचे उद्यान तयार करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.