ठाणे : व्हाॅट्सॲप समूहात जोडल्यानंतर त्या माध्यमातून ट्रेडिंगसाठी सल्ला घेणे एका ४८ वर्षीय व्यक्तीला महागात पडले. त्याची ४० लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली असून त्याने दिलेल्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वर्तकनगर भागात ४८ वर्षीय व्यक्ती राहत असून तो एका कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. मागील काही महिन्यांपासून तो एका बँकेच्या संकेतस्थळामार्फत शेअर बाजारात ऑनलाईन ट्रेडिंग करु लागला होता. या ट्रेडिंगच्या माध्यमातून नफा मिळत असल्याने त्याला शेअर बाजारातील गुंतवणूकीवर अधिक विश्वास बसला होता. मे महिन्यांत त्याला फेसबुक या समाजमाध्यमावर एक जाहिरात त्याला दिसली. त्यामध्ये शेअर बाजारा संदर्भात माहिती होती. त्यामुळे त्याने त्या जाहिरातीवर क्लिक केले. अवघ्या काही सेकंदात तो व्यक्ती एका व्हाॅट्सॲप समूहात जोडला गेला. त्यानंतर त्याला मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या ॲपवर पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले जात होते. त्याने सुरुवातीला त्यामध्ये १० हजार गुंतविले. त्यानंतर त्याला ॲपमध्ये नफा दर्शविला जात होता. ॲपमध्ये नफा दिसत असल्याने त्या व्यक्तीने टप्प्या-टप्प्याने त्यामध्ये ४० लाख ९९ हजार ८१४ रुपयांची गुंतवणूक केले. या गुंतवणूकाच्या मोबदल्यात त्यांना ८८ लाख ३९ हजार ७२ रुपये नफा दर्शविण्यात येत होता.
दुपटीने नफा दर्शविला जात असल्याने व्यक्तीने ते पैसे काढण्याचे ठरविले. परंतु ते पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.