शब्द कागदावर उमटत जातात आणि वाक्याला अर्थ प्राप्त होतो. मनाचा ठाव घेणारी ही वाक्यं कानावर पडतात, तेव्हा सुजाण रसिकांकडून आपसूकच ‘क्या बात है’ असे शब्द बाहेर पडतात. लहान वयात असताना गोष्ट ऐकण्याचा आनंद पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला तर कुणालाही आवडेल. कथा सांगणे असो किंवा या कथांचे अभिवाचन असो, धबधब्याचे पाणी जसे खळाळत वाहत असतानाही स्वच्छ दिसते, अगदी त्याचप्रमाणे मनाचे प्रतिबिंब मनाच्याच आरशात पाहता यावे, यासाठी कथा उपयुक्त आहेत. कथांचा अर्थबोध होईपर्यंत केवळ या कथांमध्ये रमणे म्हणजे साहित्याचा घेतलेला निखळ आनंद आहे. कथांचे अभिवाचन करून हा अर्थबोध रसिकांपर्यंत सतत पोहोचत राहावा यासाठी अखिल भारतीय नाटय़ परिषद, डोंबिवली शाखा, युवा विभाग आणि वेध क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने काही कथांच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन आचार्य अत्रे वाचनालय, डोंबिवली येथे करण्यात आले होते.
ज्याप्रमाणे तहान भागवण्याची क्षमता पाण्यात असते, त्याचप्रमाणे शब्द बुद्धीची आणि मनाची तृष्णा भागविण्याचे काम करत असतात. ज्येष्ठ लेखक शं.ना. नवरे आणि गो.पु. देशपांडे यांच्या कथांमधून सामाजिक भान आणि प्रत्येक व्यक्तीची दृष्टी कशी वेगळी असते हे अलगद उलगडत जाते. निसर्ग जसा इंद्रधनूसारख्या माध्यमातून निर्मळतेचा संदेश देतो, त्याचप्रमाणे लेखक कथांमधून रसाळ आणि मधाळ भाषेच्या माध्यमातून स्वत:ची ओळख निर्माण करतो. या वेळी कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात कलाकार अनुजा रानडे यांनी शं.ना. नवरे यांची ‘मानसी’ नावाच्या कथेचे अभिवाचन केले. या कथेत एका धार्मिक आणि सामाजिक भान राखणारे आचार्य आश्रमशाळा चालवितात. मात्र मोहात अडकलेले आचार्य चूक करतात. आचार्याच्या चुकांची जाणीव करून देणारी आणि त्याच आश्रमात राहणारी अनुसया त्यांना आपल्या शब्दातूनच धडा शिकविते. या कथेतून शं.ना. नवरे यांनी तरल व्यक्तिरेखा रंगवल्या. जशी रंगांची उधळण झाल्यानंतर वातावरणात चैतन्य पसरते, त्याचप्रमाणे आपल्या शब्दांच्या ओंजळीमधून या कथांद्वारे दर्जेदार साहित्याचा सुगंध पसरतो. त्यानंतर व्हिजिटिंग कार्ड या कथेचे अभिवाचन कार्यक्रमात करण्यात आले. हे अभिवाचन केतन दुर्वे, प्रथमेश बर्वे, प्रज्ञा थोरात, गजानन लुटे, शिवानी गोखले, कुशल निमकर, प्रवीण दामले, बापू राऊत, वसंत भूमकर या कलाकारांनी केले. एका व्हिजिटिंग कार्डमुळे किती गोंधळ उडतो, याचे अतिशय सुंदर आणि मजेशीर वर्णन शं.ना. नवरे यांनी केले होते, अशा भावना उपस्थित असलेल्या सर्वाच्याच होत्या.
एकाच वेळी राजकीय, सामाजिक भान राखताना नात्यांचा मेळ कसा साधायचा याचे उत्तम उदाहरण असलेले नाटक म्हणजे ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’. या नाटकोच्या पहिल्या अंकाचे अभिवाचन करण्यात आले. या अंकाच्या अभिवाचनाचे दिग्दर्शन राजन वाडेकर यांनी केले होते. भावपूर्ण अभिवाचन ऐकताना प्रत्यक्ष नाटकच पाहत असल्याचा भास रसिकांना होत होता. आनंद विश्वमित्रे, प्रमोद रेमणे, अक्षय जोशी, स्वरांगी बापट, हृषीकेष खांबेटे, राजन वाडेकर यांनी नाटकाचे अभिवाचन केले, तर रुपेश गांधी यांनी ध्वनी संयोजन करून प्रत्येक प्रवेशादरम्यान संगीताद्वारे वातावरणनिर्मिती केली. या वेळी अरुण नवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आमंत्रण आयत्या वेळी मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मात्र यापुढे शं.ना. नवरे यांच्याबद्दल कार्यक्रम करताना मला आधी कळविले तर मी नक्कीच मदत करेन. तसेच आनंदाने सहभागी होईन, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. शं.ना. नवरे यांच्या कथा ऐकण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींबरोबरच लहान मुलांनी हजेरी लावली होती. अशा कथांचे अभिवाचन केल्याने लहान मुलांमध्येही चांगले संस्कार रुजतील अशी खात्री असल्याचे वेध क्रिएशन्स आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, युवा शाखेकडून व्यक्त करण्यात आले.