उल्हासनगर: उल्हासनगर शहरात भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केले जात असल्याचा दावा पालिका करत असली तरी त्यांची संख्या नियंत्रणात येताना दिसत नाही. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या वाढतच असून त्यांचा उच्छादही वाढलेला दिसतो आहे. उल्हासनगर शहराच्या कॅम्प पाच भागात गुरुनानक बाजारपेठेत सकाळच्या सुमारास एका पाच ते सहा भटक्या श्वानांच्या टोळीने शालेय विद्यार्थिनी असलेल्या एका चिमुकलीवर हल्ला केला. सुदैवाने आसपासच्या नागरिकांनी वेळीच तिला वाचवले. त्यामुळे तिला दुखापत झाली नाही. मात्र या प्रकारानंतर चिमुकली भेदरली असून शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

उल्हासनगर शहरात गेल्या काही वर्षात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही वर्ष शहरात निर्बीजीकरण प्रक्रिया ठप्प होती. त्यामुळे शहरात श्वानांची संख्या वाढतच राहिली. पात्र संस्था मिळत नसल्याने ही प्रक्रिया थांबली होती. शहरातल्या विविध बाजारपेठेत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याकडून टाकले जाणारे खाद्य, मटन मासळी बाजाराच्या शेजारी पडणारा कचरा, नागरी वस्तीत टाकला जाणारा कचरा यावर या श्वानांची उपजीविका होत असते. त्यामुळे यांची संख्या वाढते.

रात्री उशिरा, पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर हे भटके श्वान टोळीने हल्ला करतात. असाच हल्ल्याचा एक प्रकार शहरातल्या कॅम्प पाच भागातील गुरुनानक बाजार परिसरात समोर आला आहे. ३० जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर पाच ते सहा श्वानांच्या टोळीने हल्ला केला. भर रस्त्यात जाणारी ही चिमुकली या हल्ल्यामुळे भेदरल्याचे चित्र जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या रस्त्यावर असलेले दुकानदार आणि पादचारी यांच्या सतर्कतेने या मुलीला तात्काळ सुरक्षित ठिकाणी नेले जाते असे चित्रफिती दिसते आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे. मात्र या घटनेनंतर शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भटक्या श्वानांची संख्या कमी करण्यासाठी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी होते आहे. हा प्रकार कॅम्प पाच भागातील गुरुनानक बाजारात झाला असला तरी शेजारीच मटण मासळी बाजार आहे. या ठिकाणी हे भटके श्वान पोसले जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यावरही नियंत्रण ठेवण्याची मागणी होते आहे.