उल्हासनगरः उल्हासनगर शहरातील खोदकामांमुळे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. असेच एक खोदकाम सध्या विद्यार्थ्यांसाठी जीवघेणे ठरते आहे. उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राबाहेरचा रस्ता खोदला गेल्याने येथून विद्यार्थी, नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. येथे अपघाताची भीतीही वाढली आहे. त्यामुळे येथे पर्यायी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते आहे.
उल्हासनगर शहरात विविध भागात विविध विकासकामे सुरू आहेत. गेल्या काही काळात या कामांमुळे झालेल्या खोदकामाचा मोठा फटका नागरिकांना बसला. अनेक ठिकाणी दुचाकीसह चालक खड्ड्यात पडले. तर काही ठिकाणी थेट जीवाला मुकले. कुठे पादचारी जखमी झाले तर कुठे लहान बाळ थोडक्यात बचावले. मात्र खड्ड्यांचा प्रश्न काही सुटलेला नाही. विविध ठिकाणी खोदकामांमुळे वाहनचालकांचा, पादचाऱ्यांचा प्रवास कठीण झाला आहे.
सध्या उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील फर्निचर बाजार ते शासकीय मध्यवर्ती रूग्णालयाला जोडणारा रस्ता खोदण्यात आला आहे. या मार्गावर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे. आसपासच्या शहरातून येथे अनेक विद्यार्थी येत असतात. याच भागात अनेक शिक्षण संस्था आहेत. तेथेही विविध विद्यार्थी येजा करत असतात. तसेच अनेक कामगार, ग्राहक येथून प्रवास करतात. येथे जवळच शासकीय मध्यवर्ती रूग्णालय असल्याने तेथे पोहोचण्यासाठी हा मार्ग महत्वाचा आहे. मात्र या भागात सध्या खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते आहे. येथे खोदलेल्या रस्त्यावर असलेल्या जलवाहिनीवरून शाळेत जाणाऱ्या मुलांना जावे लागते आहे. लहान मुले असुरक्षितपणे निसरड्या जलवाहिनीवरून कसरत करत येजा करत आहेत. नागरिकही अशाच प्रकारे येथून प्रवास करतात. याबाबतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर शहरातून नाराजी व्यक्त केली जाते आहे.
प्रवासाची पर्यायी आणि सुरक्षित वाट करून देण्याची जबाबदारी स्थानिक पालिका प्रशासनाची आहे. मात्र ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे. यात प्रशासनाचे अपयश असल्याची टीका आता होते आहे. येथे पर्यायी व्यवस्था करावी आणि तातडीने हे काम पूर्ण करावी अशी विनंतीही केली जाते आहे.
प्रवास धोक्याचा
शहरातल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास त्रासदायक आणि जीवघेणार झाला आहे. काही ठिकाणी खड्डे, काही ठिकाणी साचलेले पाणी असतानाच आता या ठिकाणी धोकादायक मार्ग खुला ठेवून पर्यायी व्यवस्थाही केली नसल्याचे दिसून आले आहे. यापूर्वीही काही खोदकामांच्या ठिकाणी पडून नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पालिकेशी संपर्क केला असता, या ठिकाणी तातडीने पर्यायी व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.फोटो आहे.