माशांची पैदास वाढली, स्थलांतरित पक्षीही परतले, यंदा नव्याने २४ लाखांचा निधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर: गेल्या वर्षांत सुरू झालेल्या उल्हास नदीतील जलपर्णी हटवण्याच्या मोहिमेचा परिणाम यंदा दिसू लागला आहे. जलपर्णी कमी झाली असून मासे पैदास वाढली आहे शिवाय करकोचा, कांस्यपंखी कमळ पक्ष्यासोबतच स्थलांतरित नदीसुरय पक्षीही दिसू लागला आहे. नुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत राज्याच्या अर्थमंत्र्यांनी भरीव तरतूद केली आहे.

गेल्या काही वर्षांत औद्योगिक आणि नागरी सांडपाण्यामुळे उल्हास नदीच्या प्रदूषणात भर पडून जलपर्णीची बेसुमार वाढ झाल्याचे दिसत होते. गेल्यावर्षी पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी उल्हास नदी पुनरुज्जीवनाची मोहीम हाती घेत असल्याचे जाहीर केले होते. सगुणा रुरल फाउंडेशनच्या माध्यमातून उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ग्लायफोसेट नावाचे रसायन जलपर्णीवर फवारण्यात आले, त्यामुळे जलपर्णी मृत होऊन वाहून गेली. यंदा जलपर्णीचे प्रमाण नगण्य होते. नदीकिनारी काही भागात आढळलेल्या या जलपर्णीवर पुन्हा फवारणी करण्यात आली. त्यामुळे उरलेली जलपर्णी ही नष्ट झाल्याची माहिती सगुणा रुरल फाऊंडेशनच्या चंद्रशेखर भडसावळे यांनी दिली आहे. जलपर्णीमुळे नदीतील माशांची संख्या कमी झाली होती आणि पुरेसे खाद्य नसल्याने पक्ष्यांची संख्याही घटली होती. जलपर्णी नाहीशी झाल्याने यंदा विविध प्रकारचे मासे आणि पक्षी नदीपात्राच्या आसपास फिरू लागले आहेत. गेल्या महिनाभरात उल्हास नदीत सर्वसाधारण पक्ष्यांसोबतच उघडय़ा चोचीचा करकोचा, कांस्य पंखी कमळ पक्षी, स्थलांतरित आणि संकटग्रस्त पक्षी म्हणून ओळख असलेला नदीसुरय, कापशी घार, मत्स्य गरुड हे पक्षी उल्हास नदीवर येऊ लागल्याचे दिसून आले आहे. ही बाब सकारात्मक असल्याचे चंद्रशेखर भडसावळे यांनी सांगितले आहे.  नदीतील माशांवर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांनीही माशांची संख्या समाधानकारकरीत्या वाढल्याचे सांगितले आहे. तर जलपर्णीमुळे पाणी उचल केंद्रामध्ये होणाऱ्या तांत्रिक अडचणीही आता दूर झाल्याचे समोर आले आहे.

नदी संवर्धन प्रकल्पासाठी अधिक निधीची घोषणा

जिल्हा  वार्षिक योजनेसाठी ४७५ कोटी रुपयांच्या प्रस्तावास अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंजुरी दिली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील तीन प्रकल्पांचे सादरीकरण केले. यात उल्हास नदीच्या संवर्धनाच्या प्रकल्पाचा समावेश होता. या प्रकल्पासाठी २४ लाखांच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे.

नव्या तंत्राने जलपर्णी काढण्याचे काम गेल्या वर्षांपासून सुरू केले असून यंदासुद्धा  ही प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठ महिने याचे निरिक्षण केले जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यभरात याच तंत्राची मदत होईल.

– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.

जलपर्णीमुळे मासे कमी झाले होते. शिवाय पाण्यात फिरल्याने त्वचेचे आजार उद्भवत होते. आता परिस्थितीत सुधार आहे. – सुनील केशव मुकणे, मासेमार, कल्याण ग्रामीण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success of ulhas river conservation campaign zws
First published on: 28-01-2022 at 00:19 IST