अंबरनाथ: एकेकाळी अंबरनाथसह कल्याण, मुरबाड आणि कर्जत तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी हक्काचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयाला गेल्या काही वर्षांत उतरती कळा लागली होती. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत रुग्णालयातील १६ वर्षांपूर्वी बंद झालेला शस्त्रक्रिया विभाग नव्याने सुरू करण्यात आला आहे.
अंबरनाथ शहरात असलेले डॉ. बी.जी. छाया रुग्णालयाची उभारणी १९६९ साली करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात अंबरनाथसह बदलापूर, अंबरनाथ ग्रामीण, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्ण, मुरबाड, कर्जत भागातील रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत होते. रुग्णालयात मिळणारे उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जात होत्या.
मध्यंतरी रुग्णालय पालिका आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत आले. त्यानंतर रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. या दरम्यान रुग्णालयाची व्यवस्था बिघडली होती. प्रसूती, प्रसूती शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना उल्हासनगर, कळवा किंवा ठाण्यातील शासकीय रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. अन्यथा खासगी रुग्णालयातील महागडे उपचार घ्यावे लागत होते. आपत्कालीन अपघात, शस्त्रक्रिया यांसाठीही खासगी रुग्णालयांतच धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयाचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी होत होती. यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आरोग्य विभागाकडे मागणी केली होती.
गेल्या काही महिन्यांत या रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. यात १६ वर्षांपूर्वी बंद झालेल्या शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरू करण्याचाही प्रशासनाचा मानस होता. यावेळी विभाग सुरू करण्यासोबतच जनरल फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ ही पदेही भरली गेली.
गेल्याच आठवडय़ात मुंबई आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालिका डॉ. गौरी राठोड यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया आणि शवविच्छेदन विभागाचे लोकार्पण करण्यात आले. विभागात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुणा बेलुरे, भूलतज्ज्ञ डॉ. तृप्ती चव्हाण आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा वर्षांनंतर पहिल्यांदाच या शस्त्रक्रिया पार पडल्या. आता महिलांना ही सेवा विनामूल्य उपलब्ध झाली आहे.
रुग्णालयात १० प्रसूती खाटा असून शस्त्रक्रियाही उपलब्ध झाली आहे. येत्या काळात कुटुंबनियोजन, मोतीिबदू या शस्त्रक्रिया सुरू केल्या जातील. तज्ज्ञ डॉक्टर मिळाल्यास इतर शस्त्रक्रियाही सुरू होऊ शकतील. – डॉ. हरीश पाटोळे, अधीक्षक, डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालय.