गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून बार, लॉजमालकांवर अरेरावी करणाऱ्या माटुंगा पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस भाऊसाहेब सानप याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपासून टिटवाळा, म्हारळ परिसरातील बारमध्ये गुन्हे शाखेचा पोलीस तपासणी करीत असल्याची चर्चा बार मालकांमध्ये सुरू होती. ही तपासणी हा बोगस पोलीस करीत असल्याचे पुढे आले आहे.
टिटवाळा पोलीस ठाण्यातील सुहास कांबळे, सतीश कोळी हे हवालदार शुक्रवारी टिटवाळ्यातील माताजी मंदिर भागात रात्रीची गस्त घालत होते. मंदिराच्या रस्त्यावर एक पोलीस त्याच्या साथीदारासह उभा असल्याचा कोळी यांना आढळला. पोलिसांनी त्या दोन्ही पोलिसांची चौकशी केली. आपण टिटवाळा पोलीस ठाण्यातील, कल्याण गुन्हे शाखेतील पोलीस आहोत, अशी बतावणी त्यांनी केली. हे दोघे खोटे बोलत आहेत याची जाणीव झाल्यावर कोळी, कांबळे यांनी वरिष्ठांशी संपर्क केला. भाऊसाहेब सानपसह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.
सानपच्या चौकशीतून तो माटुंगा पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तेथून त्याला निलंबित करण्यात आले आहे, असे टिटवाळा पोलिसांना समजले. तो पोलीस असल्याची बतावणी करून टिटवाळा भागातील बार, लॉजमध्ये जाऊन दुकानदारी करीत असल्याचे उघड झाले आहे.
म्हारळ येथील काही बार, लॉजमध्ये जाऊन त्याने पोलीस असल्याचे भासवले होते. तेथे बार मालकांना त्याच्या कृतीविषयी संशय आला होता.