scorecardresearch

टी-८० युध्दनौकेचा मुंबईतून कल्याणच्या दिशेने प्रवास, नौदल संग्रहालयात होणार विराजमान

दोन दिवसात या युध्द नौकेचे कल्याण दुर्गाडी किल्ला खाडी किनारी आगमन होईल, असे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

Commissioner Dr. Bhausaheb Dangde
टी ८० युध्दनौकेचे दस्तऐवज नौदल अधिकारी अधिकारी ए. एन. प्रमोद यांच्याकडून स्वीकारताना आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे.

कल्याण: कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी खाडी किनारी कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या नौदल संग्रहालयात स्मारक म्हणून विराजमान होण्यासाठी टी ८० युध्दनौकेचा कुलाबा (मुंबई) येथून कल्याणच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. दोन दिवसात या युध्द नौकेचे कल्याण दुर्गाडी किल्ला खाडी किनारी आगमन होईल, असे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी प्रकल्पातर्फे कल्याण खाडी किनारी नौदल संग्रहालय विकसित केले जात आहे. नौदलाचा प्राचीन ते आधुनिक इतिहास, सामग्री या संग्रहालयात उभारण्यात येणार आहे. संग्रहालयात युध्द नौका असावी म्हणून नौदलातील टी ८० ही युध्दनौका (निवृत्त) पालिकेला देण्याचा निर्णय नौदल विभागाने घेतला. युध्द नौका हस्तांतरणाचा कार्यक्रम शुक्रवारी मुंबईत कुलाबा येथील नौदल तळावर पार पडला. यावेळी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, माजी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी, नौदलाचे रिअल ॲडमिरल ए. एन. प्रमोद, कमोडर जिलेट कोशी, शहर अभियंता अर्जुन अहिरे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा उपस्थित होते.

हेही वाचा >>> VIDEO : ‘दुजा एकनाथ जसा, श्रीकांत हा…’’, मुख्यमंत्र्यांशी साम्य दाखवणारं श्रीकांत शिंदेंचं गाणं प्रदर्शित

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पालिका आणि नौदल यांच्यात युध्द नौका हस्तांतरणाचा सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर नौदल अधिकाऱ्यांनी कल्याणमध्ये येऊन नौका स्थापित होणाऱ्या जागेची पाहणी केली होती. नौदल संग्रहालय, युध्द नौका स्मारकाच्या निमित्ताने मराठा नौदलाचा गौरवशाली इतिहास नागरिकांना पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तरुण मंडळींना प्रेरणादायी असे हे संग्रहालय असेल. आपल्या कारकिर्दीत युध्द नौकात संग्रहायात विराजमान होईल याविषयी समाधान आहे, असे आयुक्त दांगडे यांनी सांगितले.

“ प्राचीन काळापासून नौदलाचा सामरिक इतिहास, तत्कालीन सामग्री याविषयीची माहिती, तसेच नौदलातील नोकरीच्या संधी आणि मार्गदर्शन याविषयी या संग्रहालयात माहिती असेल. पुढील पिढ्यांसाठी हे संग्रहालय खूप प्रेरणादायी आणि पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येईल.”

डाॅ. भाऊसाहेब दांगडे आयुक्त

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 18:03 IST