‘‘शाळेतील शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असावा, तरच शिक्षकाला आजच्या युगातील मुलांची परिभाषा जाणून घेता येईल,’’ असे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांनी केले.
कल्याण येथील श्री गजानन विद्या प्रसारक मंडळातर्फे २०१३ ते २०१५ या कालावधीसाठी देण्यात येणारा ‘शिक्षकभूषण पुरस्कार’ विश्वनाथ पाटील यांना प्राप्त झाला. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ तसेच रोख रूपये पाच हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ते या पुरस्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक महाजन, कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले की, शिक्षण हे आनंददायी व विद्यार्थीकेंद्री असावे. तरच विद्यार्थ्यांना त्यात स्वारस्य रहाते. विद्यार्थ्यांशी मित्र म्हणून संवाद साधल्यास विद्यार्थी हुरूपाने काम करतो. मी आजवर शिक्षक म्हणून अशाच काही सूत्रांचा आधार घेत काम करत आल्याने यशस्वी झालो.
२०१२ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आज जिल्ह्य़ातील एका शाळेने हा पुरस्कार दिल्याने त्यांनी संस्थेला धन्यवाद दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers should be the student till the end of life
First published on: 01-04-2015 at 12:10 IST