उल्हासनगरात टीम ओमी कलानीची मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उल्हासनगर: निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी यांनी स्थानिक आमदार कुमार आयलानी आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासनावर तीव्र निशाणा साधत ‘शर्म करो, खड्डे भरो’ ही मोहीम सुरू केली आहे.

उल्हासनगर शहरात रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. शहरातले जवळपास सर्वच डांबरी रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्याचा वाहनचालकांना त्रास होतो आहे. गणेशोत्सव येत्या काही दिवसात येतो आहे. मोठी मंडळे काही दिवस आधीच गणेश मूर्ती मंडपात नेत असतात. अशा मंडळांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे.

शहरात खड्ड्यांमुळे कोंडीही वाढते आहे. यावर सोशल मीडियावर अनेक टीकात्मक संदेश पोस्ट केले जात आहेत. शहरातल्या खड्ड्यांवर काही युट्यूबरने रॅप गाणीही तयार केली होती. आता पावसाचा जोर ओसरल्याने पालिकेने मास्टिंग तंत्रज्ञान वापरून खाडे भरण्याचे काम सुरू केले आहे. मात्र यावरून आता राजकारणही तापू लागले आहे.

ओमी कलानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नागरिकांना खुले आवाहन केले आहे. उल्हासनगरातील रस्त्यांची परिस्थिती पाहून सर्व नागरिक, टीम ओमी कलानीचे सदस्य, विशेषतः युवक आणि महिला यांनी रस्त्यावरील खड्ड्यांसह आपला फोटो काढून #SharamKaroKhaddaBharo, #KumarAilani आणि #My_UMC या हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करावा, जेणेकरून आपल्या आमदारांसह पालिका प्रशासन झोपेतून जागे होईल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सोशल मीडियावर मोहिमेला मोठा प्रतिसाद

ओमी कलानी यांच्या या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आपल्या भागातील खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका सुरू केली आहे. काहींनी तर खड्ड्यांवर पाणी साचलेल्या अवस्थेचे फोटो टाकून “हीच का स्मार्ट सिटी?” असा सवाल उपस्थित केला आहे. टीम ओमी कलानीच्या सदस्यांनीही शहरातल्या वेगवेगळ्या भागातले खड्ड्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दबाव वाढवण्याचा प्रयत्न

कलानी यांच्या मते, ही मोहीम फक्त राजकीय आरोप-प्रत्यारोपापुरती मर्यादित नसून, उल्हासनगरकरांच्या सुरक्षिततेसाठी आहे. “खड्ड्यांमुळे अपघात वाढत आहेत, पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. प्रशासनाकडून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डेमुक्त शहर करण्याची आम्ही मागणी करत आहोत,” असे ते म्हणाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत मोहीम आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची ठरत आहे. स्थानिक पातळीवर मतदारांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त होत असून, सोशल मीडियावरील हॅशटॅग मोहिमेमुळे हा मुद्दा राज्यस्तरावर पोहोचण्याची आशा आहे. राजकीयदृष्ट्या शहरात कलानी विरुद्ध आयलानी हा संघर्ष जुना आहे. विधानसभा निवडणुकीत पप्पू कलानी यांनी ऐन प्रचारात आयलानी यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली होती. आता पालिका निवडणुकांचा तोंडावर पुन्हा हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.