ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. या वादात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटातील दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेप्रकरणी रात्री उशीरा श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

किसनगर येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे ही उपस्थित होते. त्याचवेळी शेकडो शिंदे गटाचे कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. त्यासंदर्भाचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व प्रकारानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा नव्हता, असा दावा म्हस्के यांनी केला आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, “मुळात त्याठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा नव्हता. तिथे शिंदे गटाकडून वाढदिवासाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे तिथे शिंदे गटाचे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्ते त्याठिकाणी आले. त्यांनी आमच्या नगरसेवकाला चुकीच्या पद्धतीने जाब विचारला. तसेच आमच्या नगरसेवकाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा प्रकार घडला आहे.”