|| जयेश सामंत-आशीष धनगर
पालिकेच्या प्रदूषण मोजणी अहवालातून आकडेवारी समोर
ठाणे : वातावरणातील सकारात्मक बदलांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे दिल्लीस्थित एका संस्थेकडून मिळालेल्या पुरस्कारामुळे ठाणे महापालिका प्रशासन स्वतची पाठ थोपटवून घेत असली, तरी शहरातील हवा मात्र गेल्या काही दिवसांपासून अत्यंत प्रदूषित पातळीवर पोहचली असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीतूनच ही बाब उघडकीस आली आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या तीन हात नाका परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८४ टक्क्य़ांपर्यंत म्हणजेच धोकादायक पातळीवर पोहचला असून नौपाडा, कोपरी आणि पोखरण परिसरातही हवेचा गुणवत्ता निर्देशांक ८० ते ९० टक्के इतका म्हणजे प्रदूषित पातळीचा आहे. हा निर्देशांक ७५ टक्क्य़ांपेक्षा जास्त असेल तर हवा अत्यंत प्रदूषित मानली जाते. त्यामुळे शहराची हवा अत्यंत प्रदूषित असल्याचे चित्र आहे.
दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अर्बन अफेअर्स या संस्थेने नुकतीच स्मार्ट सिटी क्लायमेट ही स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत देशातील १०० शहरे सहभागी झाली होती. या स्पर्धेचा निकाल गेल्या आठवडय़ात जाहीर झाला असून त्यामध्ये ठाणे शहराने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. वातावरणातील सकारात्मक बदलासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ठाणे महापालिकेस हा पुरस्कार मिळाला. महापालिका प्रशासनाने गेल्या काही काळात या आघाडीवर वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असले, तरी या पुरस्कारानंतर शहर जणू काही प्रदूषणमुक्त झाले अशा पद्धतीने प्रचार करण्यात महापालिकेतील काही अधिकारी आणि त्यांचे समर्थक तथाकथित समाजसेवक सध्या आघाडीवर आहेत. प्रत्यक्षात मात्र शहरातील हवा अत्यंत प्रदूषित असल्याचे महापालिकेच्या हवा मोजणी अहवालातूनच समोर आले आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडून शहरातील हवेचे निरीक्षण आणि मापन करण्यात येते. त्यासाठी शहरातील तीन हात नाका, कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालय परिसर या रहिवासी क्षेत्रात, तर रेप्टाकोस कंपनी या औद्योगिक क्षेत्रात हवा गुणवत्ता मापन उपकरणे बसविण्यात आली आहेत. या उपकरणाद्वारे दररोज शहरातील हवेची मोजणी करून त्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त होतो. हवा प्रदूषकांमध्ये सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, फोटोकेमिकल ऑक्सिडन्ट, धुळीकण, बेन्झीन तसेच शिसे, आर्सेनिक, निकेल यासारख्या जड धातूंचा समावेश असतो. त्याचे निरीक्षण आणि मापन प्रदूषण नियंत्रण विभागाकडून करण्यात येते. महापालिकेच्या हवा मोजणीतून तीन हात नाका परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८४ टक्क्य़ांपर्यंत पोहचला आहे. तर नौपाडा, कोपरी आणि पोखरण परिसरात हवेचा गुणवत्ता गुणवत्ता निर्देशांक ८० ते ९० टक्के इतका आहे. हवा गुणवत्तेच्या मानकानुसार ही हवा अत्यंत प्रदूषित असून त्याचा परिणाम शहरातील जनजीवनावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
धुलीकणांचा त्रास
शहरामध्ये सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण २२ ते २९ मायक्रो ग्रॅम परक्युबीक मीटर इतके आहे. गेल्या आठ दिवसात १ फेब्रुवारी वगळता शहरात सल्फर डायॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडच्या प्रमाणाची पातळी चांगली होती. असे असले तरी शहरातील धुलीकणांचे प्रमाण १७० ते ३०८ मायक्रो ग्रॅम परक्युबीक मीटर इतके असून गेल्या आठ दिवसात धुलीकणांची पातळी अत्यंत प्रदूषित आहे, असे महापालिकेच्या हवा मोजणीतून समोर आली आहे.
वातावरणातील बदलांमुळे शहरातील हवा प्रदूषित झाली आहे, मात्र हे प्रदूषण तात्पुरत्या स्वरूपातील आहे. – मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण