कळवा, मुंब्रा, दिवा आणि २७ गावांमध्ये सलग दोन दिवस पाणी नाही

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने आठवडय़ातून सलग दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय जाहीर केल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांना तीव्र पाणीसंकटाचा सामना करावा लागणार आहे. कळवा-मुंब्रा-दिवा आणि डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमध्ये तर गुरुवार आणि शुक्रवार असा सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. ठाण्याच्या इतर भागात आठवडय़ातून एकदा तर कल्याण-डोंबिवलीत मंगळवार आणि शनिवार असा दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

यंदा पाटबंधारे विभागाने तब्बल ३० टक्क्यांची पाणी कपात जाहीर केली आहे. याचा प्रतिकूल परिणाम ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरांच्या पाणीपुरवठय़ावर झाला आहे. ठाणे महापालिकेने यापूर्वी आठवडय़ातून दोन दिवस पाणीकपात जाहीर केली होती. औद्योगिक विकास महामंडळाच्या नव्या कपातीमुळे आता महापालिका हद्दीत सलग तीन दिवस पाणी बंद राहणार आहे.

दर बुधवारी ठाण्यात पाणी नाही

  • ठाणे महापालिका परिसरास दररोज सुमारे ४५० एमएलडी इतक्या पाण्याची आवश्यकता भासते. हे पाणी महापालिका विविध स्रोतातून उपलब्ध करून घेत असते.
  • ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या जलस्रोतातून २०० एमएलडी तर स्टेमच्या माध्यमातून सुमारे १५० एमएलडी पाणी महापालिकेस मिळते.
  • याशिवाय मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीस्रोतामधून मिळणारे पाणी शहरातील विविध भागांमध्ये वितरित केले जाते.
  • यंदाच्या वर्षी पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे बारवी धरणातील पाण्याची पातळी खालावली असून पाटबंधारे विभागाने ३० टक्क्यांपर्यंत कपात जाहीर केली आहे.
  • ठाणे महापालिकेने मध्यंतरी पाणी वितरण व्यवस्थेचे नव्याने व्यवस्थापन करत बुधवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.
  • या नव्या वेळापत्रकानुसार आठवडय़ाच्या प्रत्येक बुधवारी ठाणे शहराचा तर शुक्रवारी कळवा-मुंब्रा, दिवा परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • एमआयडीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकामुळे कळवा-मुंब्रा आणि दिवा परिसरात सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे.

कल्याण-डोंबिवलीत दोन दिवस पाणी बंद

कल्याण-डोंबिवली शहरामध्ये आठवडय़ातून दोन दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही कपात लांबणीवर टाकण्यात आली होती. निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी पाणी कपातीचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यानुसार सोमवार, मंगळवार आणि शनिवारी कल्याण-डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा, जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा गुरुवार व शुक्रवारी असा सलग दोन दिवस बंद राहील.