ठाणे : शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश वाघ याच्याविरोधात मंगळवारी मद्य पिऊन वाहन चालविणे आणि मारहाण केल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका डाॅक्टरने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाबाबत पोलिसांकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नव्हती.

उथळसर भागातून महेश वाघ हे निवडून येत होते. ते शिवसेनेचे ठाणे महापालिकेतील नगरसेवक होते. सध्या ते शिंदे यांच्या शिवसेनेत कार्यरत आहेत. तक्रारदार हे सरकारी रुग्णालयात डाॅक्टर असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते कॅसलमील येथील मिनाताई ठाकरे चौकातून त्यांच्या बहिणीसोबत मोटारीने जात होते. त्यावेळी एक भरधाव मोटार चालक त्यांच्या दिशेने आला. त्यानंतर त्या मोटारीची डाॅक्टर यांच्या मोटारीला धडक बसली.

डाॅक्टर मोटारीतून बाहेर आले असता, पुन्हा त्यांच्या मोटारीला धडक देण्यात आली. त्यांनी त्या मोटार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना मोटारीने धडक देण्यातआली. त्यांची बहिण मोटारी बाहेर आली असता, त्यांनाही धडक देण्याचा प्रयत्न झाला. यानंतर चालक मोटारीबाहेर आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सर्वांना राबोडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी चालकाला त्याचे नाव विचारले असता, त्याने महेश वाघ असल्याचे सांगितले. याप्रकरणी महेश वाघ याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.