लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : रोकडरहित व्यवहार करण्याचे आवाहन केंद्र शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केले जात असले तरी, त्यास मात्र हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होते. मात्र, करोनाकाळात नागरिकांनी रोकडरहित व्यवहार करण्यावर भर दिला असून महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत जमा झालेल्या मालमत्ता करापैकी ३१ टक्के कर ऑनलाइनद्वारे जमा झाला आहे. गेल्या वर्षी ऑनलाइनद्वारे करभरणा करण्याचे प्रमाण १६ टक्क्य़ांच्या आसपास होते.

ठाणे शहरातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याबरोबरच महापालिका प्रशासनाने करवसुलीवर गेल्या काही महिन्यांपासून भर दिला आहे. ठाणे शहरातील ५ लाख २ हजार करदात्यांना महापालिकेने मालमत्ता कराची देयके दिली आहेत. त्यापैकी २ लाख २६ हजार करदात्यांनी ३२२ कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३५० कोटींची वसुली झाली होती. करोनाचा काळ असतानाही त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने प्रभाग समिती तसेच मुख्यालयात मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय, डीजी ठाणे अ‍ॅप आणि महापालिकेच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलॉइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शहरातील नागरिकांनी मात्र करोनाच्या भीतीपोटी पालिका कार्यालयांमध्ये जाऊन कर भरण्याऐवजी ऑनलाइन कर भरणा करण्यावर भर दिला आहे. महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३२२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असून त्यापैकी ९७ कोटी ६२ लाखांचा कर ऑनलाइनद्वारे भरला आहे. सुमारे ९० हजार करदात्यांनी ऑनलाइनद्वारे कर भरला असून ऑनलाइन करभरणा करण्याचे प्रमाण ३१ टक्के आहे. गेल्यावर्षी ऑनलाइनद्वारे करभरणा करण्याचे प्रमाण १६ टक्के होते. त्यामुळे ऑनलाइन करभरणा करण्याचे प्रमाण यंदा दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. संपूर्ण ठाणे शहरात ९० हजार नागरिकांनी ऑनलाइन मालमत्ता कर भरला असून त्यामध्ये नौपाडा, कोपरी आणि वर्तकनगर परिसरातील करदात्यांची संख्या सर्वाधिक आहे. वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात १८.९२ टक्के तर नौपाडा- कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात १६.९० टक्के करदात्यांनी ऑनलाइनद्वारे कर भरला आहे. याशिवाय २१ संकलन केंद्रावर एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारेही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याद्वारे नागरिकांनी ८४ लाखांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane citizens prefer paying tax online dd70
First published on: 01-12-2020 at 03:36 IST