ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात उद्या, सोमवारी मेट्रोच्या चाचणीसाठी ठाण्यात येणार आहे. पावसाळ्यापासून ठाण्यात मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. या वाहतुक कोंडीच्या समस्येवरुन नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. परंतु रविवारी मात्र ठाणेकरांना वेगळाच अनुभव मिळाला. मुख्यमंत्री येण्यापूर्वी म्हणजेच, रविवारी ठाण्यातील सर्व रस्ते कोंडीमुक्त होते. कित्येक महिन्यानंतर कोंडीमुक्तीचा अनुभव आल्याने ठाणेकरही अवाक झाले होते. ही कोंडी कशी काय सुटली असा प्रश्न नागरिकांना पडला होता.

ठाण्यात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. ठाणे शहरात नागरिकरण वाढल्याने मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. त्याचा ताण मध्य रेल्वे, शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर बसत आहे. त्यामुळे ठाण्यातील नोकरदारांना मुंबई गाठता यावी यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो चार आणि चार अ प्रकल्पाची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पांची कामे सध्या घोडबंदर भागातून सुरु आहे. घोडबंदर भागात पावसामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली वाईट अवस्था यामुळे घोडबंदर भागातून प्रवास करणाऱ्यांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. तासन्-तास वाहन चालक कोंडीत अडकून असतात.

ठाण्यातील वाहतुक कोंडीचा थेट परिणाम ठाणे, मिरा भाईंदर, वसई आणि भिवंडी या चार महत्त्वाच्या शहरांमध्ये बसतो. ठाण्यात अवजड वाहतुकीला बंदी घालण्याची मागणी अनेकदा होते. त्यासंदर्भाचे अनेक आदेशही काढण्यात आले. परंतु अवजड वाहतुक बंद केल्यास त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार असल्याने अवजड वाहतूक बंद करणे शक्य नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात अवजड वाहतुकीच्या बंदीचा घेतलेला निर्णय प्रशासनाला मागे घ्यावा लागला होता. वाहतुक कोंडीमुळे ठाण्यातील नागरिक, मनसेने आंदोलनही केले.

रविवार कोंडीमुक्त

ठाणे शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या या मेट्रो मार्गिकेवर चाचणी आणि तांत्रिक बाबी तपासणीसाठी मेट्रो ट्रेन धावणार आहे. ही चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. उद्या चाचणी असली तरी रविवारी ठाणे कोंडीमुक्त होते. त्यामुळे अवघ्या १० ते १५ मिनीटांत नागरिकांना ठाणे ते घोडबंदर प्रवास करणे शक्य झाले. देवेंद्र फडणवीस येणार असल्याने ठाण्यातील वाहतुक कोंडी सुटली का अशी चर्चा रंगू लागली आहे. कित्येक महिन्यानंतर कोंडीमुक्तीचा अनुभव आल्याने ठाणेकरही अवाक झाले होते.