पक्षातील नगरसेवकांवर आगपाखड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन भाजपने शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला असला तरी, या घडामोडींनंतर भाजपमधील कुरबुरी वाढल्या आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची उमेदवारी आपल्याला मिळेल, या विचाराने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्नशील असलेले भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले हे डावखरे यांच्या पक्षप्रवेशामुळे प्रचंड नाराज आहेत. त्यामुळेच बुधवारी डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षातील डावखरे समर्थक नगरसेवकांवर आगपाखड केली. ‘आम्ही आयुष्यभर पक्षासाठी सतरंज्याच उचलायच्या का?’ असा सवाल करत लेले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांच्या नावे खडे फोडल्याचे सूत्रांनी सांगितले.

एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या सहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांनी भाजपच्या संजय केळकर यांचा पराभव केला होता. केळकर हे गतविधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली होती. ठाणे भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले, महापालिकेतील पक्षाचे गटनेते मिलिंद पाटणकर, कोकणातील पक्षाचे नेते बाळ माने हे या उमेदवारीसाठी आधीपासून प्रयत्नशील होते. लेले यांनी तर पदवीधर मतदारांना शुभेच्छा पत्रे पाठवणे, त्यांच्या बैठका घेणे, अशी कामे करून मतदारांशी संपर्कही वाढवला होता. असे असतानाच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या डावखरे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळणे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुक प्रचंड नाराज आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डावखरे यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या बहुतांश नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये कोपरी परिसरात लक्ष्मण टिकमानी, भरत चव्हाण तसेच घोडबंदर भागात मनोहर डुंबरे अशा नगरसेवकांचा समावेश होता.  या नगरसेवकांनी निरंजन यांच्या भाजपप्रवेशासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. काही नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्याकरवी प्रयत्न चालवले होते. या हालचालींना बुधवारी मूर्त स्वरूप मिळाले व डावखरे भाजपमध्ये आले. मात्र, या घडामोडीनंतर भाजपमधील काही नेतेमंडळी नाराज असून संदीप लेले यांनी बुधवारी उघडपणे ही नाराजी व्यक्त केली. ‘पक्षात वर्षांनुवर्षे काम करणाऱ्यांना किंमत नाही आणि आता तुम्ही बाहेरून येऊन उमेदवाऱ्या मिळवणार,’ अशा शब्दांत लेले यांनी डावखरे समर्थक नगरसेवकांवर आगपाखड केल्याचे समजते.

लेले यांचा इन्कार

पक्षातील नगरसेवकांसोबत वाद घातल्याच्या वृत्ताचा संदीप लेले यांनी इन्कार केला आहे. ‘कोकण पदवीधर मतदारसंघात पक्षाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये माझा समावेश होता. मला उमेदवारी मिळाली असती तर आनंद वाटला असता. परंतु पक्षाने राजकीय कारणाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे. माझ्या नाराजीचे वृत्त पूर्णपणे खोटे आणि निराधार आहे,’ असे ते म्हणाले.

 

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane city president unhappy over niranjan davkhare entry in bjp
First published on: 25-05-2018 at 02:58 IST