महापालिकेच्या सूचनेनंतरही क्लबची जलतरणपटूंकडून वारेमाप शुल्कवसुली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेने स्वखर्चाने उभारून व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवलेल्या ठाणे क्लब अर्थात प्रबोधनकार क्रीडा संकुलाकडून जलतरणपटूंना आकारण्यात येणाऱ्या मनमानी शुल्काविरोधात आंदोलने, तक्रारी, नाराजी व्यक्त होऊनदेखील क्लबची मनमानी सुरूच आहे. ऑलिम्पिक दर्जाच्या तरणतलावात पोहण्याचा सराव करण्यासाठी येणाऱ्या जलतरणपटूंना पालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा कैकपट अधिक शुल्क आकारण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातूनच ही माहिती उघड झाली आहे.

ठाण्यातील एलबीएस मार्गाजवळ महापालिकेच्या मालकीचे प्रबोधनकार क्रीडासंकुल असून या संकुलाच्या व्यवस्थापनाची जबाबादारी गणेशानंद डेव्हलपर्स यांच्याकडे आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मंडळींनी या जागेमध्ये सुरू केलेल्या उपक्रमांसाठी मनमानी शुल्क आकारणी सुरू केली आहे. याला क्लबचे सदस्य, जलतरणपटू आणि सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. या विरोधाला ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून वाचा फोडण्यात आल्यानंतर ठाणे महापालिकेने यात हस्तक्षेप केला होता. त्यानंतर क्लबचे शुल्क काही प्रमाणात कमी झाले असले तरी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने संमत केलेल्या ठरावास ठाणे क्लबने पायदळी तुडवले आहे.

क्लबच्या मनमानी शुल्क आकारणीप्रकरणी उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.  महापालिकेने संबंधित ठेकेदाराला

नागरिकांकडून १० हजारांचे शुल्क घेण्याची परवानगी दिली. मात्र तरीही ठाणे क्लबचा मनमानीपणा सुरू असून येथे येणाऱ्या प्रत्येकाकडून ६० हजारांपासून ५ लाख रुपयांपर्यंतची लूट करण्यात येत असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही, असे याचिकांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी महापालिकेनेही न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत क्लबच्या मनमानी शुल्कआकारणीवर शिक्कामोर्तब केले आहे. गणेशानंद डेव्हलपर्ससोबत झालेल्या करारानुसार प्रत्येक कुटुंबास १८ हजार रुपयांचे शुल्क आकारण्याचे ठरले होते. त्यानंतर ते १० हजार रुपये प्रतिसदस्य असे करण्यात आले. मात्र गणेशानंद डेव्हलपर्सकडून त्यापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याची कबुली पालिकेने दिली आहे.

अशोककुमार सावंत, विश्वास बर्वे, रेश्मा पोवळे, अमृता गाडा यांनी यासंबंधी पहिली जनहित याचिका दाखल केली आहे तर उमा सलाये, प्रियंका नायक, दिलीप ननावरे, प्रशांत म्हात्रे यांनी दुसरी जनहित याचिका दाखल केली आहे.  या प्रकरणातील पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मूळ शुल्काच्या कैकपट अधिक वसुली

* ठाणे महापालिकेच्या नियमावलीमध्ये एका कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांची दोन लहान मुले हे एकत्रित सदस्य होऊ शकतात. त्यांच्याकडून एकूण १८ हजार रुपये शुल्क घेण्यास सहमती देण्यात आली होती. शिवाय हे शुल्क ३३ महिन्यांसाठी लागू करण्यात आले होते.  विशेष म्हणजे हे शुल्क तेथील सगळ्या प्रकाराच्या उपक्रमांसाठी लागू आहे.

* शुल्काविषयी नियमावली असतानाही हे नियम पायदळी तुडवून क्लबने मूळ शुल्काच्या कैकपट अधिक रकमेची वसुली सुरू केली आहे.

* या प्रकरणी ठाणे महापालिकेने हस्तक्षेप करून १० हजार प्रतिसदस्य इतके शुल्क आकारण्यास सहमती दर्शवली. मात्र ही रक्कम

अधिक असल्याचेही सूचित केले होते. मात्र या सूचनेलाही क्लबने हरताळ फासला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane club charge more fees from swimmers despite tmc notice
First published on: 28-10-2016 at 01:47 IST