ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बालक आणि मातांच्या पोषण स्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी “कुपोषणमुक्त ठाणे” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून योग्य आहार मिळावा यासाठी ” अंगवणवाडी सक्षमीकरण टीम ” स्थापन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या “पोषण अभिसरण समिती” व “कुपोषण निर्मूलन टास्क फोर्स” च्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्णय दिले आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पोषण स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ३,५६१ अंगणवाडी केंद्रांमार्फत १०० टक्के पूरक पोषण आहार नियमित वितरित होत बैठकीत सादर करण्यात आले. या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. मात्र, या यशानंतरही पोषण व्यवस्थेच्या शाश्वत परिणामासाठी अंगणवाडी सेविकांच्या क्षमता विकासावर भर देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी स्पष्ट केले.

अंगणवाडी केंद्रांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी जिल्हास्तरावर “अंगणवाडी सक्षमीकरण टीम” स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या टीममध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, स्वयंसेवी संस्था सदस्य यांचा समावेश राहणार असून, केंद्रांच्या प्रशिक्षण, देखरेख आणि सेवा गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा साधली जाणार आहे.

पूरक पोषण आहाराची शंभर टक्के अंमलबजावणी ही आनंददायी बाब असली, तरी आता आपले लक्ष सेवांच्या गुणवत्तेकडे आणि सक्षमीकरणाकडे असले पाहिजे. स्थानिक स्तरावर अंगणवाडी सेविका आणि प्रकल्प अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतल्यास ‘कुपोषणमुक्त ठाणे’ हे स्वप्न साकार होईल,” असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठामपणे सांगितले.