रुग्णालयांचे लेखापरीक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; पुरवठय़ासोबत गैरवापरावरही लक्ष

विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमधील प्राणवायू पुरवठा यंत्रणेचे त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्याचे आदेश सोमवारी नगरविकासमंत्री एकनाथ िशदे यांनी दिले असतानाच ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका तसेच नगरपालिकांनी आपल्या हद्दीतील रुग्णालयांमध्ये प्रत्यक्षात वापरात आणल्या जाणाऱ्या प्राणवायू वापराचे लेखापरीक्षण करण्याच्या सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या. मागणी आणि पुरवठय़ाचे गणित बसविताना अजूनही सर्वच शहरांमधील यंत्रणांची दमछाक होत आहे. पुरवठा यंत्रणेत काही बिघाड होऊ नये याची काळजी घेत असताना प्रत्यक्ष वापराचे गणितही तपासून पाहाता यावे यासाठी हा प्रयोग राबविला जाणार आहे.

ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील वेदांत रुग्णालयात दाखल असलेल्या चार रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राणवायू पुरवठा यंत्रणेत दोष निर्माण झाल्याने हे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एकनाथ िशदे यांनी महानगर क्षेत्रातील सर्वच रुग्णालयांच्या तपासणीचे आदेश सोमवारी दिले. जिल्हाधिकारी तसेच त्या त्या शहरांमधील महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या देखरेखीखाली त्रयस्थ संस्थेमार्फत या अग्निरोधक यंत्रणा, वीज वितरण व्यवस्था तसेच प्राणवायू पुरवठा व्यवस्थेचे यापुढील काळात परीक्षण केले जाणार आहे. हे करत असताना दररोज वापरात आणल्या जाणारा प्राणवायूचा पुरवठा नेमका किती आणि कसा होता याकडेही लक्ष पुरविण्याची आवश्यकता निर्माण झाली असून त्यामुळेच येत्या काळात वापराचे लेखापरीक्षणही केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी दिल्या. महापालिका तसेच नगरपालिकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक जिल्हा मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. यात  आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा तातडीने अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नवी मुंबईचा पॅटर्न जिल्हाभर

रुग्णालयांमधील प्राणवायू यंत्रणेत ऐन वेळी दोष निर्माण होऊ नये यासाठी यंत्रणेचे परीक्षण करण्यासोबतच पुरवठा आणि वापराचे गणित तपासण्याचा प्रयोग नवी मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले असून या पथकामार्फत ही तपासणी केली जात आहे. हा पॅटर्न शासकीय मानकांना अधीन राहून जिल्हाभर राबविला जावा, अशी सूचना मंगळवारी झालेल्या बैठकीत पुढे आली. त्यास जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी मान्यता दिली. शहरातील कोविड रुग्णालयांची संख्या, तेथील प्राणवायू खाटा, होणारा पुरवठा, रुग्णांना नेमका किती प्राणवायू लागतो तसेच गळतीचे प्रमाण काही आहे किंवा नाही याची तपासणी या लेखापरीक्षणामार्फत होऊ शकणार आहे. प्राणवायू तसेच अतिदक्षता कक्षात दैनंदिन होणारा पुरवठा आणि वापर याचेही गणित यामुळे तपासणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्य़ातील प्राणवायू पुरवठय़ाची नेमकी स्थिती स्पष्ट होण्यात अधिक सोपे होईल, असा दावा केला जात आहे.

३०० मेट्रिक टनची गरज

ठाणे जिल्ह्य़ात १९० ते २०० मेट्रिक टन प्राणवायू पुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ५६ हजारांच्या घरात असताना २७५ ते ३०० मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता होती. साधारणपणे १८ ते १९  टक्के रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासते असा निष्कर्ष मध्यंतरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला होता.

प्राणवायू पुरवठा यंत्रणा व्यवस्थित आहे अथवा नाही याचे लेखापरीक्षण तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना यासंबंधी कोणती कार्यपद्धती आखली जावी याविषयीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी