सोन्या-चांदीचे दागिने, वाहने तसेच मौल्यवान वस्तूंपाठोपाठ आता चोरटे बकरेही चोरू लागल्याचा प्रकार भिवंडीतील एका घटनेमुळे उघडकीस आला आहे. भिवंडी येथील युनूसनगर भागात राहणारे अब्दुल रजाक शेख (६३) हे परिसरातील मोकळ्या जागेत चार बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेले. तिथे बकरे चरत असताना शेख यांना त्यांचा एक मित्र भेटला. या मित्रासोबत गप्पा मारत असताना चोरटय़ांनी त्यांचे बकरे चोरून नेले. या बकऱ्यांची किंमत सुमारे ४० हजारांच्या आसपास आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांगणी ग्रामपंचायत निवडणूक १७ एप्रिलला
बदलापूर, प्रतिनिधी
नगरपंचायतीत समावेश होता होता राहिलेल्या जिल्ह्य़ातील सर्वात मोठय़ा वागंणी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सहा प्रभागातील १७ जागांसाठी ही निवडणूक होईल.
बदलापूरनंतर वाढत्या नागरीकीकरणाचे लोण वांगणीपर्यंत पोहोचले आहे. त्याचसोबत येणाऱ्या नागरी समस्याही वांगणीसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे वांगणीचा समावेश नगरपंचायतीत केला जाणार होता. मात्र काही कारणास्तव तो राहिला. त्यामुळे आता भविष्यातील गोष्टींचा विचार करून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेत २९ मार्च ते २ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ४ एप्रिल रोजी अर्जाची छाननी होऊन ६ एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी त्यांच्या निवडणूक चिन्हांसह जाहीर केली जाणार आहे.
१७ एप्रिल रोजी मतदान होईल, तर १८ एप्रिल रोजी अंबरनाथ तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाईल. याआधी ग्रामपंचायतीवर गावफंड समितीचे वर्चस्व होते. यात आता खरी लढाई शिवसेना आणि भाजप दरम्यान असली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसही मैदानात उतरणार आहे.

दोन जणांवर जीवघेणा हल्ला
ठाणे : आर्थिक देवाण घेवाणीवरून झालेल्या वादातून पाच जणांनी दोन जणांना मारहाण केल्याची घटना बुधवारी मनोरमानगर भागात घडली असून याप्रकरणी कापुरबावडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ठाणे येथील आझादनगर भागात राहणारे भूषण पाटील व कमलेश पाटीलयांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद झाला होता. या वादातून कमलेश व त्याचे साथीदार संदेश गुंजाळ, आकाश यादव आणि इतर दोघांनी भूषण व त्याचा मित्र राजू या दोघांना मारहाण केली. कमलेशने भूषण याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारला, तर आकाशने राजू याच्या गालावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत राजूची सोन्याची चैनदेखील गहाळ झाली. मनोरमानगर परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कमलेश आणि संदेश या दोघांना अटक केली आहे.

भिवंडीत दुचाकीस्वाराचा मृत्यू
ठाणे : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री भिवंडीत घडली. ठाणे येथील राबोडी भागात राहणारे महमद रफिक शेख (३०) हे दुचाकीवरून भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने येत होते. त्यावेळी भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक सचिन ज्ञानदेव शितोळे (३२) याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीत घरफोडी
ठाणे : डोंबिवली परिसरातील अमेय अपार्टमेंटमध्ये चोरी झाल्याची घटना बुधवारी घडली असून चोरटय़ांनी घरातून पाच लाख ९० हजारांचा ऐवज लुटून नेला आहे. अमेय अपार्टमेंटमध्ये राहणारे नितीन पट्टेकर हे काही कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी घराचा कडिकोयंडा तोडून ही चोरी केली. यामध्ये चोरटय़ांनी घरातून पाच लाख ९० हजारांचा ऐवज लुटून नेला असून त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आदीचा समावेश आहे.
याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.