महिलेला बांग्लादेशातून आणून तिच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. डायघर परिसरातील अमन हाईट्स इमारतीत पीडीत महिलांपैकी एका महिलेस गुंगीचे औषध देऊन बांग्लादेशातून आणले आणि वेश्याव्यवसायासाठी विकले.
तसेच तीन पीडीत महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत ग्राहकांशी शरीरसबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांनी रब्बी मुल्ला, व्यवस्थापक लक्ष्मण, समीर राणा, प्रदुमन गोकुल साहू (२९), राजेशकुमार श्रीविष्णूधारी यादव (१९) यांना अटक केली. या प्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळसूत्र खेचले
डोबिंवली : डोंबिवली येथील गांधीनगर परिसरातील आषापुरा पार्क इमारतीत राहणाऱ्या भारती अशोक मांढरे (५०) या गुरुवारी रात्री इमारतीसमोरील होळीची पूजा करुन घरी येत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या चोरटय़ांनी मांढरे यांचे एक लाख १३ हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र खेचले. या प्रकरणी मानपाडा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवलीत दोन चोऱ्या
डोबिंवली : येथील हनुमान मंदिरासमोर राहणाऱ्या श्रीकांत बजरंग पवार (२९) यांच्या घरी बुधवारी चोरी झाली. मुख्य दरवाजाची कडी कापून चोरटय़ाने आत प्रवेश केला आणि ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले. दुसऱ्या एका घटनेत पेंडसेनगर येथे राहणाऱ्या अंजली लक्ष्मण कडलाक यांच्या घरी चोरी झाली. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धुळवडीत १६ बोकडांची चोरी
ठाणे : होळीच्या आधी लाकुड चोरीचे प्रकार सर्रास होतात. बुधवारी रात्री कोपरी परिसरातील आनंदनगर येथील मटणाच्या दुकानातून चक्क १६ बोकड चोरल्याची घटना घडली आहे. अब्दुल उस्मान शेख (५८) यांच्या महाराष्ट्र मटन शॉप या दुकानाचे लोखंडी कुलुप तोडून चोरटय़ाने आत प्रवेश केला आणि ६० हजार रुपये किंमतीचे काटेवाडी जातीचे १६ बोकड चोरले. धुळवडीत बोकडच्या मटणाला मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्यामुळे बोकड चोरीची घटना घडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बोकडचोरी करणाऱ्या टोळीचा तपास सुरू आहे.
बारवर छापा
ठाणे : येथील ओवळा भागात असलेल्या सी हॉक बारमध्ये गैरप्रकार चालत असल्याची माहिती मिळाल्याने गुरुवारी रात्री पोलीसांनी बारवर धाड टाकली. त्यावेळी गैरप्रकार करत असलेल्या चार बारबालांसह बारचा व्यवस्थापक छोटनकुमार चुरामन  आणि मालकास अटक करण्यात आली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.