बदलापूर : मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने यंदा जुलै महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश जलस्त्रोत वेळेआधीच भरले आहेत. गेल्या सहा वर्षातला हा विक्रम आहे. ऐरवी जुलै महिन्याच्या मध्यात जलस्त्रोत निम्मे भरलेले असतात. यंदा ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणात तब्बल ७५ टक्के इतका विक्रमी पाणीसाठा झाला आहे. तर भातसा धरणातही ७७ आणि आंध्रा धरणात ७२ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्याची पाणीचिंता मिटली आहे.
यंदाच्या वर्षात पावसाने मे महिन्यापासूनच बरसण्यास सुरूवात केली. सुरूवातीला राज्यात आणि विशेषतः कोकण भागात पश्चिम विक्षोभामुळे पाऊस कोसळला. त्यामुळे मे महिना असूनही तापमानात घट नोंदवली गेली होती. भर उन्हाळ्यात गारवा जाणवत होता. संपूर्ण मे महिना पावसाची परिस्थिती होती. मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात पुन्हा पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पश्चिम विक्षोभाच्या पावसानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. पावसाने कोणताही मोठा खंड घेतला नसल्याने संततधार पावसामुळे जलस्त्रोतांमध्ये मे अखेर पासूनच चांगला साठा होण्यास सुरूवात झाली. जून महिन्याच्या अखेरपर्यंत ठाणे जिल्ह्यातील जलसाठे हे निम्म्याहून अधिक भरले होते. जुलै महिन्यातही पावसाचा जोर सुरूच आहे. त्यामुळे जलसाठ्यांनी चांगली पातळी गाठली आहे.
जुलै महिन्यात ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ७५ टक्क्यापर्यंत पाणीसाठा जमा झाला आहे. बारवी धरणाची पाणी क्षमता ३३८ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. १५ जुलै रोजी धरणात २५५.४० दशलक्ष घनमीटर इतका साठा होता. बारवी धरण ७५ टक्के भरले आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षात यंदाच्या वर्षात सर्वाधिक पाणी साठा बारवी धरणात झालेला आहे. ज्या उल्हास नदीत आंध्रा धरणातील पाण्याचाही विसर्ग केला जातो. त्या आंध्रा धरणातही तब्बल ७२ टक्के इतका पाणी साठा आहे. आंध्रा धरण गेल्या काही वर्षात जुलै महिन्यात एकदाही ५० टक्क्यांवर भरले गेलेले नव्हते. मात्र यंदा हा विक्रम मोडीत निघाला आहे. शहापुरजवळील भातसा धरणातही ७३० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. धरण तब्बल ७७ टक्के क्षमतेने भरलेले आहे. गेल्या काही वर्षातला हाही एक विक्रम आहे.
धरणातील १५ जुलैचा पाणीसाठा आकडेवारी
धरण २०२५ २०२४ २०२३ २०२२ २०२१ २०२०
भातसा ७७ ४९ ४२ ७६ ३७ ४६
बारवी ७५.३७ ४२.३४ ४०.८७ ६० ३७ ४१.८८
आंध्रा ७२.८४ ३८ ३४ ४५ १९ ३३