जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा दावा, बोटीतून नदीची पाहणी
उल्हासनगर : उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी उल्हास नदीची पाहणी केली. उल्हास नदीची सध्याची स्थिती चांगली असून जलपर्णी हटवण्याची मोहीम प्रथमदर्शनी यशस्वी होत असल्याचे दिसते आहे, असे त्यांनी बोटीतून उल्हास नदीची पाहणी केल्यानंतर सांगितले. येत्या काही महिन्यांत सातत्याने नदीची देखरेख केली जाणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. राज्य नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नदीचे सादरीकरण केल्यानंतर उल्हास नदीच्या या मोहिमेत संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
उल्हास नदीला अनेक सांडपाणी वाहून नेणारे नाले मिसळत असल्याने जलपर्णीचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत वाढले होते. त्यामुळे अनेक सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी आंदोलनात उतरले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्थानिक पालिकांच्या आयुक्तांना सोबत घेऊन नदीला जलपर्णीमुक्त करण्यासाठी मोहीम राबवली होती.
गेल्या वर्षांत सगुणा रुरल फाऊंडेशनच्या माध्यमातून जैविक फवारणी करून जलपर्णी हटविण्याचे प्रयोग करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या वर्षांत उल्हास नदीवर जलपर्णी आढळली नाही. त्याचे चांगले परिणाम नदी आणि आसपासच्या परिसरावर पाहायला मिळाले. त्यामुळे राज्य नियोजन समितीच्या बैठकीत ठाण्याचे जिल्हाधिकारी
राजेश नार्वेकर यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. त्यासाठी स्वतंत्र निधी जाहीर करून या प्रकल्पावर अधिक लक्ष देत देखरेख करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी वरप आणि कांबा वरप गावाजवळ उल्हास नदीची पाहणी केली.
सगुणा रुरल फाऊंडेशनचे चंद्रशेखर भडसावळे, कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख, वरप आणि कांबा गावाचे सरपंच, उल्हास नदी बचाव कृती समितीचे सदस्य आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बोटीतून फिरत नदीची पाहणी केली. या वेळी जैविक फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याप्रसंगी उल्हास नदीची सध्याची स्थिती सकारात्मक असल्याचे मत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले.
जलपर्णी मोहिमेचे यश प्रथमदर्शनी दिसते आहे. मात्र, तरीही आम्ही या नदीवर होणाऱ्या परिणामांवर लक्ष ठेवून असणार आहोत, अशीही माहिती या वेळी नार्वेकर यांनी दिली. उल्हास नदीत मिसळणाऱ्या नाल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पालिका प्रयत्न करत असून त्यावरही लक्ष ठेवले जात असल्याचेही नार्वेकर यांनी या वेळी सांगितले.
सांडपाणी रोखा
जलपर्णीमुक्तीसाठी नदीपात्रात आंदोलन करणाऱ्या मी कल्याणकर संस्थेचे नितीन निकम यांनी या वेळी जलपर्णी काढण्याबाबत केलेले प्रयोग यशस्वी वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, या नदीत मिसळणारे नाले बंद करा अशी विनंती त्यांनी या वेळी केली. उपस्थित बहुतांश पर्यावरणप्रेमींनी सांडपाणी रोखण्याची मागणी केली.
अहवाल घेऊनच फवारणी जैविक फवारणी करत असताना त्याच्या सर्व गोष्टींवरच्या परिणामांची प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यानंतर फवारणीचा निर्णय घेतल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. नदीवर पाण्यासाठी अवलंबून असलेल्या ५० लाख नागरिकांचा या वेळी विचार केला गेला, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
