ठाणे : रिचार्ज करण्यासाठी गुगलवरुन ग्राहक मदत क्रमांक शोधणे एका कुटुंबाला महागात पडले. १४९ रुपयांच्या रिचार्जसाठी सुमारे अडीच लाख रुपये गमवावे लागले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झालेली व्यक्ती घोडबंदर येथील मोघरपाडा भागात वास्तव्यास आहे. सुमारे २० दिवसांपूर्वी त्यांना घरातील टीव्हीवर ओटीटी प्लॅटफाॅर्मची सेवा सुरु करायची होती. त्यामुळे त्यांच्या पत्नीने गुगलवर जाऊन त्याबाबत माहितीचा शोध घेतला. त्यांना गुगलवर ग्राहक मदत क्रमांक दिसला. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, मनोज नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

फसवणूक झालेल्या व्यक्तीने ओटीटी बाबत माहिती विचारली असता, मनोज याने त्यांना १४९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल असे त्यांना सांगितले. त्यानंतर मनोज याने त्या व्यक्तीकडून त्यांचा व्हाॅट्सॲप क्रमांक मागितला. त्यावर रिचार्जसाठी एक लिंक पाठवित संभाषण बंद केले. फसवणूक झालेल्या व्यक्तीने संबंधित लिंक सुरु केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी रिचार्ज करण्यासाठी पत्नीच्या बँक खात्याची सर्व माहिती सामाविष्ट केली.

परंतु रिचार्ज झाले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा त्या मदत क्रमांकावर संपर्क साधला असता, त्यांनी दुसऱ्या बँक खात्यातून रिचार्ज करण्यास सांगितले. फसणूक झालेल्या व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातूनही रिचार्ज करण्यासाठी संबंधित लिंकवर माहिती भरली. काही वेळाने त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यातून एकत्रित २ लाख ४६ हजार रुपये इतर खात्यांमध्ये वळते झाल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.