ठाणे : पूर्व द्रूतगती महामार्गावरील सेवा रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून चार जणांनी एका पादचाऱ्याला २५ हजार रुपयांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, पादचाऱ्याला त्याच्या मोबाईलद्वारे ऑनलाईनरित्या पैसे पाठविण्यास सांगितले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वागळे इस्टेट भागात ३९ वर्षीय व्यक्ती राहतो. मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ते पूर्व द्रूतगती महामार्गावर फ्लाॅवर व्हॅली सेवा रस्ता परिसरातून पायी जात होते. त्याचवेळी दोन दुचाकीवरुन चारजण त्यांच्या दिशेने आले. त्यांनी त्या व्यक्तीला अडविले. तसेच, चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली.
त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याच्या मोबाईलमधील एका ॲपद्वारे त्यांनी किती पैसे आहेत, याबाबत विचारले. त्या व्यक्तीच्या बँक खात्यात ३१ हजार ७०० रुपये जमा असल्याचे समोर आले. त्यानंतर त्या चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर २५ हजार ३०० रुपये त्या व्यक्तीस क्यूआर कोडद्वारे पाठविण्यास सांगितले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.