Thane Municipal Corporation : ठाणे : शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाचे आकर्षण होते, ते म्हणजे व्यासपीठावरील पडदा. ४७ वर्षांपुर्वी विविध रंगाच्या कापडांनी नक्षीकाम करत हा पडदा तयार करण्यात आला होता. त्यावरील मोराची नक्षीकाम सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. गडकरी रंगायतनचे नुतनीकरण करण्यात आले. या कामानंतर तब्बल दहा महिन्यानंतर लोकार्पण कार्यक्रमावेळी गडकरी रंगायतनचा पडदा खुला झाला पण, जुन्या पडद्याऐवजी लाल रंगाचा नवीन पडदा पाहून अनेकांनी नाराजीचा सूर लावला. या पडद्यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून तोच धागा पकडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पडदासारखाच पडदा पुन्हा लावण्याची सुचना पालिकेला केली. मात्र, हा पडदा बदलण्यामागेचे कारण आता समोर आले आहे.
राम गणेश गडकरी रंगायतनचे भुमीपुजन १९७४ मध्ये झाले आणि १९७८ मध्ये रंगायतनचे लोकार्पण झाले होते. १९९८ साली नाट्यगृहाची दुरूस्ती करण्यात आली होती. त्यानंतर २६ वर्षांनंतर म्हणजेच ऑक्टोबर २०२४ मध्ये नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, रंगायतनच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या कामासाठी नाट्यगृह गेले दहा महिने बंद होते.
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नुतनीकरण केलेल्या रंगायतनचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजेच व्यासपीठावरील बदलेला पडदा. याआधी व्यासपीठावर मोराचे नक्षीकाम असलेला पडदा होता. तो सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा आणि रंगायतनचे आकर्षण हा पडदा होता. पण, तोच बदलून तेथे कोणतेही नक्षीकाम नसलेला लाल रंगाचा पडदा बसविण्यात आला आहे. त्यावरून नागरिकांमधून नाराजीचा सुर उमटत आहे.
पडद्य बदलण्यावरून नाराजी
या नाट्यगृहामध्ये नाटकांचे प्रयोग तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही नाट्यगृहात प्रेक्षकांची गर्दी दिसून येते. त्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. नाट्यगृहात जाण्यासाठी प्रेक्षकांना जिने चढावे लागतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांना जिने चढ-उतार करणे शक्य होत नाही. त्यांची दमछाक होते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने रंगायतनमध्ये उदवाहक बसविली आहे. त्याचे कौतुक होत असले तरी पडद्या बदलण्यावरून मात्र समाजमाध्यांवर नाराजीचा सूर उमटत आहे.
जून्या पडद्याची माहिती
नाट्यगृहाच्या व्यासपीठासमोरील पडद्या ४७ वर्षांपुर्वी बसविण्यात आला होता. त्यावर विविध रंगाचे कपडे जोडून हाताने नक्षीकाम करण्यात आले होते. चंदा चारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पडदा तयार केला होता. त्यावरील मोराची नक्षीकाम सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. जुना पडद्यासाठी त्यावेळी २२ हजार रुपये खर्च झाले होते. नाट्यगृहाचे आकर्षण असलेला हा पडदा जुना व जीर्ण झाला होता. त्यामुळे या पडद्याचे जतन करण्याबरोबरच तशाचपद्धतीचा नवीन पडदा तयार करून तो बसविण्याचा निर्णय पालिकेने सुरूवातीला घेतला होता.
चंदा चारी यांच्याकडूनच हा पडदा तयार करून घेतला जाणार होता आणि त्यासाठी पालिकेने त्यांच्याशी संपर्कही साधला होता. नवीन पडद्यासाठी २२ लाख रुपये खर्च होणार होता आणि तो देण्याची तयारी पालिकेने दाखविली होती. परंतु नाट्यगृहात अग्निरोधक पडदा असणे बंधनकारक आहे. यामुळे पालिकेने जुन्या पडद्याप्रमाणेच नवीन पडदा घेण्याचा निर्णय मागे घेत अग्निरोधक पडदा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सात लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.