Thane News : ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून रस्त्यावर मंडप उभारणी करण्यात येते. त्यासाठी ठाणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाची परवानगी बंधनकारक असते. आतापर्यंत ८८ मंडळानी गणेशोत्सव मंडपासाठी अर्ज केले असून त्यापैकी एकाच मंडळाला पालिकेने परवानगी दिली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध देखावे उभारून सामाजिक संदेश देण्यात येतो. यासाठी मंडळांकडून रस्त्यावर मंडप उभारणी करण्यात येते. सार्वजनिक उत्सवांसाठी सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच रस्ते आणि पदपथ येथे तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारणी बाबत उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्व आखून दिली आहेत. त्याचे पालन झाले की नाही, याचा आढावा उच्च न्यायालयाकडून उत्सव संपल्यानंतर घेतला जातो. विनापरवानगी मंडप उभारण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे सक्त आदेश आहेत. विनापरवानगी मंडप उभारल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल होऊ शकते. मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाची परवानगी बंधनकारक असते.
ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा
गणेशोत्सव मंडप परवानगी मिळविण्यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्सवाच्या किमान एक महिना अगोदर अर्ज करणे आवश्यक असते. मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ठाणे महापालिका गेल्या पाच वर्षांपासून मंडळांना ऑनलाईन आणि ऑफलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. ही सुविधा यावर्षी देखील पालिकेने उपलब्ध करून दिली आहे.
परवानगीसाठी मंडळांना द्यावी लागते ही माहिती
सार्वजनिक उत्सव मंडळांकडून मंडप परवानगीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करतांना अर्जासोबत मंडप उभारण्यात येणाऱ्या जागेचा पत्ता आणि ढोबळ नकाशा, मंडळांचे पदाधिकाऱ्यांची नावे आणि मोबाईल नंबरसह यादी, मंडपात अग्निशमन सिलेंडर (Fire Extinguisher) ठेवल्याबाबतचे अधिकृत अनुज्ञप्तीधारकाकडील प्रमाणपत्राची प्रत पीडीएफ (pdf) स्वरुपात अपलोड करणे आवश्यक असते.
दाखल अर्ज आणि परवानगी
ठाणे महापालिकेकडे गेल्यावर्षी गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे एकूण ३३३ अर्ज दाखल झाले होते, पैकी २६४ मंडळांना परवानगी देण्यात आली होती. यंदा गणेशोत्सवासाठी २० दिवस शिल्लक राहिले आहेत. या गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी मंडळांनी ८८ मंडळांनी अर्ज केले आहेत. त्यात ५८ मंडळांनी ऑनलाईनद्वारे तर ३० मंडळांनी ऑफलाईनद्वारे अर्ज केले आहेत. ८८ मंडळांपैकी एकाच मंडळाला मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे मंडळ वर्तकनगर भागातील आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.