डॉक्टरांची आरोग्यविषयक जागृती
नागरिकांमधील आरोग्य जाणिवा अधिक सुदृढ व्हाव्यात तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी जागृत राहावे, हा संदेश पोहोचविण्यासाठी ठाण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनांनी येत्या रविवारी एका विशेष मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. ठाण्याच्या उपवन तलावाच्या काठावरून सुरू होणारी ही मॅरेथॉन केवळ शहरातील डॉक्टरांसाठी असणार आहे. त्यामुळे या मॅरेथॉनचे नामकरण ‘डॉकेथॉन’ असे करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील अडीचशेहून अधिक डॉक्टर धावणार आहेत. महिलांमधील ‘गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगा’विषयी जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या डॉकेथॉनच्या आयोजक डॉ. आशा कारखानीस यांनी दिली.
ठाण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ ठाणे गायनाकॉलॉजिस्ट’ संघटनेने पुढाकार घेऊन जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला.
अशी असेल डॉकेथॉन..
रविवार १९ जून रोजी सकाळी ६.३० वाजता डॉकेथॉन ठाण्यातील उपवन तलावाच्या परिसरात होणार आहे. तीन विभागांत ही धावण्याची स्पर्धा होणार असून ३ किमी, ६ किमी आणि ९ किमी अशा अंतराचे हे मार्ग असणार आहेत. ३ किमीचा मार्ग उपवन – वसंत विहार स्कूल – वसंत विहार स्कूल, ६ किमीचा मार्ग उपवन – डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह- उपवन, तर ९ किमी मार्ग उपवन – निळकंठ बंगला- उपवन असे असणार आहेत. ठाण्यातील ‘रिदमिक रनिंग’ या संस्थेच्या माध्यमातून नागेश शेट्टी हे प्रशिक्षक या मॅरेथॉनचे तांत्रिक बाबी सांभाळणार आहेत, अशी माहिती डॉ. महेश बेडेकर यांनी दिली.
उपवनसारख्या निसर्गसंपदा असलेल्या भागामध्ये व्यायाम केल्यास मन प्रसन्न होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या शरीर आणि मनाला आनंद देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच या माध्यमातून समाजातील आरोग्यविषयक जाणिवाही अधिक सुदृढ करण्यास मदत करता येऊ शकते.
– डॉ. आशा कारखानीस, अध्यक्षा, असोसिएशन ऑफ ठाणे गायनाकॉलॉजिस्ट