ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील कामगार नाका परिसरात गेले काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीत वाहन चालकांना १५ ते २० मिनिट अडकून राहावे लागत असल्यामुळे त्यांच्यामधून संताप व्यक्त केला जात आहे. या कोंडीमुळे रिक्षा किंवा बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना कामगार नाका येथे उतरुन पुढे लोकमान्य नगर, इंदिरा नगर तसेच यशोधन नगरपर्यंत घरी पायी जावे लागत आहे. या दररोजच्या कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत.
वागळे इस्टेट भागातील कामगार नाका परिसर हा वाहतूकीसाठी महत्त्वाचा चौक मानला जातो. या चौकातून अंबिका नगर, इंदिरानगर, यशोधन नगर आणि नितीन कंपनी या परिसरात जाण्याचा मार्ग आहे. तसेच लोकमान्यनगर येथे ठाणे परिवहन उपक्रमाचा बस आगार आहे. दिवसभर या मार्गावर टीएमटी बस गाड्यांची वाहतूक सुरु असते. सायंकाळच्या वेळी या मार्गावर वाहनांचा भार मोठ्याप्रमाणात असतो. परंतू, गेले काही दिवसांपासून कामागार नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. कामगार चौकात ही वाहतूक कोंडी होत असल्यामुळे अंबिका नगर ते कामगार नाका, कामगार रुग्णालय ते कामगार नाका, कामगार नाका ते सावरकरनगर आणि इंदिरा नगर ते कामगार नाका या मार्गांवर कोंडीचा फटका बसत आहे. या कोंडीत टीएमटी बस गाड्या, खासगी वाहने तसेच रिक्षा सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून राहतात. त्यामुळे अनेक प्रवाशांना या कामगार नाक्यापासूनचा पुढील प्रवास हा चालत करावा लागत असल्यामुळे त्यांच्या मधून संताप व्यक्त होत आहे. कामगार चौकात चारी बाजूने येणाऱ्या गाड्या अडकून राहतात. वाहन चालकांना या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी कसरत करावी लागते. परंतू, एवढी वाहतूक कोंडी होऊन देखील अनेकदा वाहतूक पोलिस याठिकाणी उपस्थित नसल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडण्यास आणखी विलंब होतो.
वाहतूक कोंडी का होतेय ?
ज्ञानेश्वर नगर ते कामगार नाका, अंबिका नगर ते कामगार नाका, सावरकर नगर ते कामगार नाका आणि इंदिरा नगर ते कामगार नाका या मार्गावर बेकायदेशिर पद्धतीने चारचाकी वाहने, बस, दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. तसेच या मार्गावर काही खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या देखील उभ्या असतात. त्यामुळे सायंकाळच्या वेळी वाहनांना या परिसरातून वाट काढणे अवघड होत आहे.
कामगार नाका तसेच अंबिका नगर परिसरातून येणाऱ्या वाहनांपैकी अनेक वाहने ही सावरकरनगरच्या दिशेने जाणारी असतात. सावरकर नगरचा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे कामगार नाका परिसरातून सावरकर नगरकडे वळण घेताना वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस त्या ठिकाणी हजर असतात. तसेच रस्त्यांच्या बाजूला बेकायदेशिर पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांवर देखील वारंवार कारवाई केली जाते.कृष्णा कोकणी, वाहतूक पोलिस निरीक्षक वागळे इस्टेट.