ठाणे – कृष्ण जन्माष्टमी निमित्त शुक्रवारी बाळकुम येथील इस्कॉन मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली. मंदिरातील गाभाऱ्यात फुलांची आरास करण्यात आली असून भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली होती. मात्र, दर्शनासाठी ठाणे जिल्ह्यासह बाहेरील भागांतून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे बाळकुम, कापूरबावडी, कोलशेत आणि ढोकाळी परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिकांना या कोंडीत अडकून राहावे लागले.

कोळशेत आणि बाळकुम भागाला जोडणाऱ्या राम मारूती रोड या रस्त्यालगत असलेल्या पिरॅमल वैकुंठ संकुलात मागीलवर्षी इस्कॉन मंदिर उभारण्यात आले आहे. बाळकुम मार्गे कोळशेत, हायलँड भागात जाणाऱ्या वाहन चालक प्रवाशांना हा मार्ग महत्त्वाचा आहे. इस्कॉन मंदिर उभारल्यानंतर दररोज या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. मात्र जन्माष्टमीच्या निमित्ताने भाविकांच्या सकाळपासून लांबच लांब रांगा मंदिराच्या आत आणि बाहेर लागल्या होत्या.

दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांच्या रांगा देखील रस्त्यावर दिसून येत होत्या. मागील काही वर्षापासून बाळकुम, कोलशेत, ढोकाळी भागात मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे येथे नागरी वस्ती देखील वाढली आहे. नागरी वस्ती वाढल्याने या भागातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच याच भागात ठाणे महापालिकेचे सेंट्रल पार्क हे उद्यान आहे. या उद्यानात देखील नागरिक येत असतात. असे असले तरी येथील रस्ते अद्यापही अरुंद आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे.

त्यात स्वातंत्र्य दिन आणि कृष्ण जन्माष्टमी एकाच दिवशी आल्याने अनेक नागरिक या वाहतूक कोंडीत अडकले होते. सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने नागरिकांनी पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केल्याने रस्त्यावर वाहनांचा भार वाढला यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यात दहीहंडीसाठी विविध भागात व्यासपीठ उभारण्यात आले आहेत याचा देखील परिणाम या वाहतूक कोंडीवर होत असल्याचे दिसून आले.

या वाहतूक कोंडीमध्ये बसगाड्या, रिक्षा अडकल्या आहेत. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या मंदिरात जाण्यासाठी बाळकुम, कोलशेत आणि ढोकाळी या तिन्ही मार्गांचा वापर होतो. त्यामुळे या मार्गांवरून कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर पडलेले नागरिकही वाहतूक कोंडीत अडकले. या भागातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस कार्यरत होते.