ठाणे– शहरातील कोलशेत भागात असलेल्या लोढा अमारा या गृहसंकुलातील एका २८ मजली इमारतीच्या २२ व्या मजल्यावर मोठी आग लागल्याची घटना उघडकीस आली. ही आग लागल्यामुळे गृहसंकुलात भितीचे वातावरण पसरले आणि नागरिक इमारतीबाहेर पळू लागले. यामुळे इमारतीच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आणि नागरिकांचा आक्रोश सुरू होता. आगीच्या धुराचा त्रास झाल्याने दोन नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात एकाचा मृत्यु झाला आहे.
राजेंद्र तिवारी आणि जयश्री ठाकरे(३६) यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी तिवारी यांची प्रकृती स्थिर आहे. तर, जयश्री यांचा मृत्यु झाला आहे. कोलशेत भागात मोठ्याप्रमाणात गृहसंकुले आहेत. त्यामुळे सकाळ – सायंकाळ कोलशेत रोडवर नागरिकांची मोठी वर्दळ असते. वाहतूकीसाठी देखील हा महत्त्वाचा रस्ता आहे.
कोलशेत एअर फोर्स जवळ असलेल्या लोढा अमारा या बड्या गृहसंकुलातील इमारत क्रमांक ८ या २८ मजली इमारतीच्या २२ व्या मजल्यावरील वैशाली कळव यांच्या मालकीची सदनिका क्रमांक २२०३ मध्ये गुरुवारी सायंकाळी आग लागली होती. त्यांनी हे घर व्यंकटेश यांना भाड्याने दिले होते. या आगीच्या धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरलेले होते. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी संकुलाबाहेर धाव घेतली आणि यामुळे संकुलाच्या आवारात नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही नागरिक मात्र सदनिकेतच होते. नागरिक ही संकुलात कोण राहिले आहे का याची माहिती घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना देत होते.
या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, ठाणे अग्निशमन दल तसेच पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन दलाने संकुलात अडकलेल्या नागरिकांना संकुलाबाहेर काढले. इमारतीमधील अंदाजे ३७५ लोकांना अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सुटका केली. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू होते. इमारतीच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आणि नागरिकांचा आक्रोश सुरू होता. दोन तासाहून अधिकचा काळ ही आग शमविण्यासाठी लागला. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांची गर्दी झाली होती. यामुळे या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाची वाहने घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे हे कर्मचारी स्वत: वाहनातून उतरून या कोंडीतून वाट काढत घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचताच त्यांनी इमारतीतील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून खाली गृहसंकुलाच्या आवारात आणले. त्यानंतर, अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग विझविण्यास सुरुवात केली. दोन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग शमविण्यात अग्निशमन विभागाला यश आले.
कोळशेत रोड परिसरातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. आनंदनगर भागातील नागरिक घोडबंदरच्या मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी याच मार्गे प्रवास करतात. आगीच्या घटनेमुळे येथे वाहतूक कोंडी झाली होती.