हसनैनच्या बहिणीच्या जबाबाची प्रतीक्षा
रविवारी पहाटे आपल्याच आप्तस्वकीयांचा बळी घेणाऱ्या कासारवडवली गावातील हसनैन वरेकर याच्या कृत्यामागील नेमके कारण २४ तासानंतरही स्पष्ट होऊ शकलेले नाही. या हत्याकांडातून बचावलेली हसनैनची २२ वर्षीय बहीण सुबियाशी संवाद साधण्याचा पोलिसांचा प्रयत्नही यशस्वी होऊ शकलेला नाही.
घडलेल्या कृत्याविषयी सुबियाला प्रश्न करताच ‘मेरी बच्ची किधर है’ हा एकच प्रश्न ती विचारते आणि बेशुद्ध पडते. त्यामुळे या भयानक घटनेची एकमेव साक्षीदार असलेली सुबियाशी कधी संवाद साधता येतो, या प्रतीक्षेत पोलीस आहेत, अशी माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
हसनैन काही वर्षांपूर्वी भोंदूबाबांच्या संपर्कात आल्याची माहिती मात्र पोलिसांना मिळाली आहे. या माहितीच्या आधारे हसनैन कोणत्या दग्र्यास नियमीत भेट द्यायचा तसेच कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात असायचा याचाही तपास पोलिसांनी सुरु केला आहे. तसेच घरात अथवा बाहेर तो एखादा धार्मिक विधी करायचा का याची माहिती मिळवली जात आहे, असे डुम्बरे यांनी सांगितले.
कासारवडवली गावात परदेशी बाबा दर्गा असून तिथे हसनैनचे वडील अन्वर हे ट्रस्टी होते.
साधारपणे २०१२ सालच्या मध्यावर हसनैनने भोंदूबाबाकडून आणलेल्या औषधामुळे त्याच्या घरातील तिघांना उलटय़ा आणि जुलाबाचा त्रास झाला होता. त्यावेळच्या उपचारासंबंधीची कागदपत्रे रुग्णालयाकडे उपलब्ध नाहीत. या घटनेची सत्यता पोलीस पडताळून पहात असून प्राथमिक माहितीनुसार तो भोंदूबाबाच्या नियमीत संपर्कात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही डुंबरे यांनी स्पष्ट केले.
‘शिक्षकप्रिय विद्यार्थी’
हसनैन शालेय जिवनात ‘शिक्षक प्रिय’ विद्याथी होता. राबोडी येथील अंजुमन खैरूल इस्लामिक शाळेत शिकलेल्या हसनैन याने शालेय जिवनामध्ये शिक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे त्याच्या शिक्षकांसाठी हा मोठा धक्कादायक प्रसंग असल्याचे त्याचे मराठी विषयाचे शिक्षक मुजिब शेख यांनी सांगितले.