ठाणे : मुलासाठी वधू शोधणे एका ६८ वर्षीय महिलेला महाग पडले. विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून एका तरुणीशी ओळख झाल्यानंतर तिने कूट चलनाच्या (क्रिप्टो करन्सी) नावाखाली वृद्धेची ऑनलाईनरित्या ६८ लाख रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झालेली महिला ठाण्यात राहते. त्यांच्या मुलाचे विवाह करण्यासाठी त्यांनी विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळ तसेच फेसबुक खात्यांवर त्याची थोडक्यात माहिती दिली होती. ही माहिती पाहून २०२३ मध्ये एका तरुणीने त्यांना मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क साधला. तसेच त्यांची माहिती तिने विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावर मिळाल्याचे सांगितले. तिने वराच्या शोधात असल्याचे सांगितल्याने वृद्धेला तिच्यावर विश्वास बसला. वृद्ध महिला तिच्या सोबत समाजमाध्यमावर चॅटींग, मोबाईल क्रमांकावर संवाद साधत असे. परंतु तरुणी कधीही त्यांच्यासोबत व्हिडीओ काॅलवर बोलत नसे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांनी त्या तरुणीने वृद्धेला सांगितले की, माझा भाऊ कूट चलनात गुंतवणूक करतो. त्याद्वारे जादा परतावा मिळतो. वृद्धेला तरुणीवर विश्वास बसल्याने तिने सुरुवातील पैसे गुंतविले. त्यात तिला चांगला परतावा मिळाला. त्यानंतर तिने टप्प्याटप्प्याने तिच्याकडे ६८ लाख रुपयांची ऑनलाईनरित्या गुंतवणूक केली. परंतु तिला कोणताही परतावा मिळत नव्हता. याबाबत तिने मुलाला सांगितल्यानंतर हा फसवणूकाचा प्रकार असल्याचे तिच्या लक्षात आले. वृद्धेने याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे, गुन्हा दाखल झाला आहे.