Thane Municipal Corporation : ठाणे : शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरात ‘ठाणे महापौर बंगला’ ( Thane Mayor’s Bungalow ) आहे. निसर्गरम्य वातावरणात हा बंगला पालिकेने काही वर्षांपूर्वी उभारला होता. गेली अनेक वर्षे ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता राहिली असून यामुळे ‘ठाणे महापौर बंगला’ येथे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या महत्वाच्या बैठक पार पडल्या आहेत. गेले अनेक वर्षे राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेला महापौर बंगला इतिहास जमा होणार आहे. कारण, नव्या विकास आराखड्यात हा बंगला आता रेमंडच्या जागेवर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे या बंगल्याची जागा बदलण्यामागे काय कारण असू शकते, याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत.

ठाणे महापालिकेची पाचपखाडी परिसरात चार मजली मुख्यालय इमारत आहे. या इमारतीत अनेक विभागांची कार्यालये आहेत. याशिवाय, शहरात नऊ प्रभाग समितींची कार्यालये आहेत. परंतु वाढत्या नागरिकरणामुळे प्रशासकीय इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे ठाणे येथील वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर ५७२ कोटी रुपये खर्चुन ठाणे महापालिकेची नवीन आणि सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यात येत आहे. मुख्यालयाच्या आराखड्यानुसार ही नवी इमारत ३२ मजल्यांची असेल. एक लाख १६ हजार ९०३ चौरस मीटरचे बांधकाम क्षेत्र, त्यात ७१ हजार ४४ चौरस मीटरचे कार्यालय, ९ हजार ८५९ चौरस मीटरचे सभागृह असा तामझाम या इमारतीत असणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी बगीचा आरक्षण बदलण्यात आले आणि त्याचबरोबर जलकुंभाचे सुरू असलेले काम थांबविण्यात आले होते. त्यास स्थानिक रहिवाशांकडून विरोधही केला होता.

महापौर बंगला रेमंडच्या जागेवर

ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरात ‘ठाणे महापौर बंगला’ आहे. शहरातील राजकीय घडामोडींचे केंद्र म्हणून हा बंगला ओळखला जातो. निवडणुकांच्या काळात हा बंगला सातत्याने चर्चेत असतो. याच बंगल्यातून निवडणुकांच्या काळात पक्षाच्या गुप्त बैठका आणि रणनिती आखण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून होते, अशी चर्चा असते. गेली अनेक वर्षे ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता राहिली असून यामुळे ‘ठाणे महापौर बंगला’ येथे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या महत्वाच्या बैठक पार पडल्या आहेत. गेले अनेक वर्षे राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेला महापौर बंगला इतिहास जमा होणार असून नव्या विकास आराखड्यात हा बंगला आता रेमंडच्या जागेवर प्रस्तावित करण्यात आला आहे.

आराखड्यात काय म्हटले आहे

रेमंड संकुलामध्ये ठाणे महापालिका भवन इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असल्याने, त्याच्या लगत नागरीकांच्या सोयीकरीता उर्वरीत रेमंड संकुलातील सुविधेच्या ॲमिनिटीच्या माध्यमातुन भूखंड प्राप्त झाला आहे. या भूखंडाचे क्षेत्र २६१० चौरस मीटर इतके आहे. या क्षेत्रावरती नव्याने “आरक्षण क्रमांक ११३ ब – महापौर निवास” हे आरक्षण तसेच या आरक्षणाकरीता १८ मीटर रुंद विकास योजना रस्ता प्रस्तावित केला आहे. या आरक्षण फेरबदलासाठी पालिकेने आता नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.

हे कारण असण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात ठाण्यामध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक ( Anand Dighe Memorial ) उभारण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार, ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना त्यात उपवन तलाव परिसरातील ‘ठाणे महापौर बंगला’ या वास्तुमध्ये आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. मात्र त्याचे पुढे काहीच झालेले नव्हते. असे असतानाच विद्यमान ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याच्या प्रकल्पाला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळल्याची चर्चा होती. यावरून शिवसेनेतून नाराजीचा सूर उमटला होता. दरम्यान, उपवनमधील महापौर बंगला रेमंडच्या जागेवर हलविण्याचे पालिका प्रशासनाने नव्या आराखड्यात प्रस्तावित केले आहे. त्यामुळे दिघे यांच्या स्मारकासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.