ठाणे : ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे ते कासारवडवली या मेट्रो-४ प्रकल्पाचे काम सुरू आहे. यासाठी घोडबंदर रस्त्यावरील ओवळा आणि कासारवडवली येथील स्थानकांचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असून या स्थानकांवर ये-जा करणाऱ्या जिन्यांचे बांधकाम भर रस्त्यात करण्यात येत आहे. या कामांच्या त्रुटींवर बोट ठेवत एमएमआरडीएचा हा महमद तुकलघी कारभार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे ओवळा-माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी केली आहे.
घोडबंदर रोड मुख्य रस्त्याचे सेवा रस्त्यात विलीनीकरणाच्या काम सुरू असून या रस्त्याच्या मधोमध मेट्रो स्थानकाचे जिने उभारण्यात येत आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्याच्या कडेला तयार करणे अपेक्षित आहे. परंतु हे जिने सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध म्हणजेच भररस्त्यात उभारण्यात येत आहे. हा एमएमआरडीएचा हा महमद तुकलघी कारभार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे ओवळा-माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी केली असून त्याचबरोबर एका लेखी पत्राद्वारे एमएमआरडीएचे महानगर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ ची घोडबंदर रस्त्यावरील ओवळा आणि कासारवडवली हि स्थानके बांधून तयार झाली आहेत. मेट्रो-४ चे काम गेली काही वर्षे सुरू असून गेल्या वर्षी घोडबंदर मुख्य रस्त्याचे दोन्ही सेवास्त्यामध्ये विलीनीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. मेट्रो आणि घोडबंदर रस्ता व सेवा रस्ता विलीनीकरणाचे काम ही दोन्ही कामे एमएमआरडीएकडूनच करण्यात येत असून या जिन्यांसाठीचा खर्च वाया जाणार असल्याने या नुकसानीस आणि महमद तुकलघी कारभारास जबाबदार कोण? असा सवालही नरेश मणेरा यांनी पत्रात उपस्थित केला आहे.
घोडबंदर मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्याच्या विलीनीकरणामुळे दोन्ही बाजूचे घोडबंदर रस्ते हे एकदिशामार्गी होणार असल्याने या रस्त्याला लागून असलेल्या हौसिंग सोसायटीतील दुचाकी-चारचाकी वाहनांच्या चालकांना रस्त्यावर येता-जातांना अत्यंत धोकादायक आणि असुरक्षित तर ठरणार आहेच. शिवाय वाहनचालकांचा वेळ व इंधनही वाया जाणार असल्याचे मणेरा यांनी पत्रात म्हटले आहे. त्यासाठी घोडबंदर विलीनीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूस निदान नऊ मीटरचा सेवा रस्ता ठेवण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत येथील प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशीही विनंती नरेश मणेरा यांनी महानगर आयुक्तांना केली आहे.