ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये नागरिकांना सुरक्षितपणे सकाळच्या वेळेत फेरफटका मारण्याबरोबरच व्यायाम करता यावा या उद्देशातून तीन ठिकाणी येत्या १ एप्रिलपासून ”मॉर्निंग वॉक प्लाझा” ही नवीन संकल्पना राबविण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच कोविडोत्तर व्यायाम आणि सकाळच्या वेळेत फेरफटका मारणे, हे महत्वाचे झाले असून यामुळेच ही संकल्पना राबविण्यात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.


राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाणे शहरातील येऊर डोंगराच्या पायथ्यालगतच्या उपवन तलाव परिसरात “मॉर्निंग वॉक प्लाझा” उभारण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने सकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना सुरक्षितपणे चालणे शक्य होणार आहे. उपवन येथील महापौर निवासस्थान ते पायलादेवी मंदिर चौक, वीर बिरसा मुंडा चौक ते डॉ. काशिनाथ नाट्यगृह आणि धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार ते वाहतूक पोलीस कार्यालय अशा तीन ठिकाणी “मॉर्निंग वॉक प्लाझा” तयार करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ५.३० ते ८ या कालावधीत हा मॉर्निंग वॉक प्लाझा सुरु राहणार आहे.


या तिन्ही परिसराची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत गुरुवारी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त मारुती खोडके, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. मॉर्निंग वॉक प्लाझा च्या मार्गावरील वाहतूक दररोज सकाळी ५.३० ते ८ या कालावधीत वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. दरम्यान, उपवन परिसरात तातडीने मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचे काम हाती घेवून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले. तसेच दोन्ही बाजूला पदपथ बांधणे, स्वच्छता, साफसफाई, भिंतीची रंगरंगोटी व वृक्ष लागवडही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना यावेळी दिले.


सध्यस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकाळच्या वेळेत फेरफटका मारणे हे महत्वाचे झाले आहे. करोनातून मुक्त झाल्यानंतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ लागल्या असून त्या दृष्टीकोनातूनही व्यायाम आणि सकाळच्या वेळेत फेरफटका मारणे हे महत्वाचे बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त शर्मा यांनी “मॉर्निंग वॉक प्लाझा” ही नवीन राबविण्याचा निर्णय घेतला आहे.