ठाणे – मिराभाईंदर शहरात मराठी भाषेवरुन झालेल्या वादामुळे मनसे, शिवसेना (ठाकरे गट) आणि मराठी एकीकरण समितीच्या वतीने मोर्चा काढलेला असतानाच, दुसरीकडे ठाणे शहरात मी मराठी, मी हिंदी, मी गुजराती, मी मद्रासी, मी पंजाबी, मी सिंधी “आम्ही महाराष्ट्र सोबत” “आम्ही हिंदुत्वा सोबत” आम्ही एकनाथ शिंदेंसोबत अशा आशयाचा अनोखा बॅनर लागला आहे. वृंदावन परिसरात हा बॅनर लावण्यात आला असून या परिसरातील सर्व भाषिक नागरिकांनी एकत्र येत एकतेचा संदेश दिला आहे.
मिराभाईंदर शहरात मराठी न बोलण्याच्या वादावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे, शिवसेना (ठाकरे गट) आणि मराठी एकीकरण समिती तसेच अन्य संघटनेच्या मार्फत मंगळवारी, आज मिरा-भाईंदर शहरात मोर्चा काढण्यात आला आहे. असे असतानाच, दुसरीकडे ठाणे शहरात मी मराठी, मी हिंदी, मी गुजराती, मी मद्रासी, मी पंजाबी, मी सिंधी “आम्ही महाराष्ट्र सोबत” “आम्ही हिंदुत्वा सोबत” आम्ही एकनाथ शिंदेंसोबत अशा आशयाचे बॅनर लागल्याचे दिसत आहे.
ठाण्य़ातील वृंदावन परिसरात शिवसेना (शिंदे गट) अमरावती निरीक्षक अमित जयस्वाल यांच्या माध्यमातून हा बॅनर लावण्यात आला आहे. यावेळी वृंदावन सोसायटी आणि श्रीरंग परिसरातील सर्व धर्मीय, सर्व भाषिक नागरिक एकत्र येऊन त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. त्यांनी सर्व भाषिक एकत्र दाखवत एकतेचा संदेश दिला आहे.महाराष्ट्रात मराठी आणि इतर भाषांचा वाद सुरु आहे. परंतू, हा वाद सुरु असताना अमित जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाषिक, सर्व धर्मीय नागरिक एकत्र जमले होते. या प्रत्येक नागरिकांनी आपल्या भाषेत आणि मराठी भाषेत आम्ही हिंदुत्वा सोबत, आम्ही महाराष्ट्रासोबत आणि आम्ही एकनाथ शिंदेंसोबत असा नारा दिला.