ठाणे – ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय अशी ओळख असलेल्या ठाणे शहराला स्वच्छ शहर अशी नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या इंडीयन स्वच्छता लीग उपक्रमांतर्गत पालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ठाण्यातील हजारो विद्यार्थ्यांनी रविवारी फलकांद्वारे स्वच्छतेचे संदेश दिले. त्याचबरोबर पर्यावरणपूरक प्रकल्पाच्या प्रतिकृती, गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा आणि स्वच्छतेची शपथ असे वैविध्यपुर्ण उपक्रमही पार पडले. शिवाय, सफाई काम करणाऱ्या कांता ठाकूर, अनिल ठाकूर यांचा अभिनेता भाऊ कदम सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच या दाम्पत्याच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध लाभदायी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत हे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात रविवारी मुख्य कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांसाठी संकल्पनात्मक रचना या विषयावर प्रकल्प सादरीकरण स्पर्धा आयोजित केली होती. त्यात महापालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांचा सहभाग होता. तसेच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ठाणे महापालिकेच्यावतीने सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. कोपरी ते कळवा परिसरातील कांदळवन, पारसिक हिल येथे श्रमदान पार पडले. या सोहळ्यात विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. डिमॉलिशन या समूहाने शिवनाट्य सादर केले. श्यामोली यांनी टाकाऊ पासून टिकाऊ कलाकृती बनवणे, स्टॅण्ड अप कॉमेडिअन पुष्कर बेंद्रे यांनी विनोद सादर केले. आफरिन बॅण्डने विविध गाणी सादर केली.

हेही वाचा >>>उल्हासनगरच्या मनसेला शहराध्यक्ष मिळेना, ४ महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी बरखास्त केलेली कार्यकारिणी

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. स्वच्छतेत ठाणे शहर देशात अव्वल यावे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन भाऊ कदम यांनी केले. तर, मधुराणी प्रभुलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वच्छतेचा संदेश घरोघरी घेवून जाण्याचे आवाहन केले.

Story img Loader