tv18ठाणे महापालिकेचे नवे आयुक्त संजीव जैयस्वाल यांनी आपल्या पहिल्याच स्थानक दौऱ्यात फेरीवाले, बेकायदा टपऱ्या साफ करण्याचा विडा उचलत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून या सगळ्या परिसराला फेरीवाल्यांपासून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मनात पुन्हा एकदा आशेची पालवी फुटली असली तरी आयुक्तांची ही धडाडी पुढेही कायम राहील का, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

ठा णे रेल्वे स्थानक परिसरातील पदपथांनी गेल्या आठवडय़ात अखेर मोकळा श्वास घेतला. तब्बल दीड वर्षांनी हे शक्य झाले. न्यायालयाच्या आदेशाचा बागुलबूवा उभा करत स्थानक परिसरच नव्हे तर ठाणे, कळव्याच्या गल्लीबोळात फेरीवाल्यांचा अक्षरश धुमाकूळ सुरू आहे. बेकायदा टपऱ्या, बांधकामे यांची तर गणतीच करायला नको. नवे आयुक्त संजीव जैयस्वाल यांनी आपल्या पहिल्याच स्थानक दौऱ्यात फेरीवाले, बेकायदा टपऱ्या साफ करण्याचा विडा उचलत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. खबरदार.. मी कधीही परतेन, असा दम त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना भरला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून या सगळ्या परिसराला फेरीवाल्यांपासून मुक्ती मिळाली आहे. कार्यभार स्वीकारताच ठाणेकरांची नेमकी नस ठाऊक असल्याप्रमाणे आयुक्तांनी रेल्वे स्थानक गाठले. त्यामुळे प्रवाशांच्या मनात पुन्हा एकदा आशेची पालवी फुटली असली तरी आयुक्तांची ही धडाडी पुढेही कायम राहील का याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.
मध्य रेल्वेने मध्यंतरी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सहा लाख प्रवाशांची ये-जा असते. या सहा लाख प्रवाशांमध्ये नेमके ठाणेकर किती हा जरी संशोधनाचा विषय असला तरी या स्थानकाचे आणि येथील परिसराचे दळणवळणाच्या दृष्टीने असलेले अनन्यसाधारण महत्त्व कुणालाही नाकारता येणार नाही. कळवा आणि मुंब््रय़ाचा परिसर वगळला तरीही मूळ ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येसाठी एकमेव असे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे नागरिकरणाचा विचार करता या भागातील दळणवळणाचा विचार झालेला नाही हे तर स्पष्टच आहे. गेली अनेक वर्षे कोपरी परिसरात ठाण्यासाठी विस्तारित स्थानक उभारण्याची चर्चा सुरू आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल, मात्र सद्य:स्थितीतील स्थानक आणि तेथे पोहण्याची व्यवस्था सुलभ होईल, अशी कोणतीही व्यवस्था येथील राजकीय नेते आणि प्रशासकीय यंत्रणांना उभी करता आलेली नाही हे वास्तव आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गर्दी कमी व्हावी यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून सॅटीससारखा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. हा प्रकल्प उभा केल्याबद्दल काही माजी महापौर अजूनही स्वतची पाठ थोपटवून घेण्यात मग्न दिसतात. असे असले तरी या प्रकल्पाच्या उभारणीत असलेल्या तांत्रिक दोषाबद्दल मात्र उघडपणे बोलताना फारसे कुणीही दिसत नाही. या ठिकाणी एखादी बस बंद पडली तर संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात अजूनही वाहतूक कोंडी होते इतक्या ढिसाळ पद्धतीने या सगळ्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. तांत्रिक आघाडीवर हा प्रकल्प पुरता फसला असताना मानवी अतिक्रमणांमुळे सॅटीस ओलांडून स्थानकाकडे कूच करताना ठाणेकर प्रवाशांची अक्षरश दमछाक होत असल्यासारखे चित्र दिसत आहे.
रोजच मरे..त्याला कोण रडे
ठाणे शहराच्या कोणत्याही भागातून रेल्वे स्थानकाच्या दिशेने येणे हे मुळातच दिव्य. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसचा तुटवडा, रिक्षा चालकांची मग्रुरी, पुरेशा वाहनतळांचा अभाव, बेकायदा पार्किंगचा वेढा यांसारख्या अतिक्रमणातून स्थानकात पोहचल्यावर गर्दीने तुडुंब ओसंडून वाहणाऱ्या लोकलमधून मुंबई गाठणाऱ्या प्रवाशांची काय अवस्था होत असेल हा विचारच मुळी अस्वस्थ करणारा ठरावा. असे असताना लाखोंच्या संख्येने ठाणेकर प्रवासी दररोज हे दिव्य नित्यनेमाने पार पाडत असतात. कामावरून थकून भागून घरी परतताना यापेक्षा वेगळे काही पदरी पडण्याची शक्यताही विरळच. अशा परिस्थितीत नवे आयुक्त संजीव जैयस्वाल यांनी स्वत: रस्त्यावर उतरून ठाणे स्थानक परिसराची सफाई हाती घेतल्याने ठाणेकर निश्चितच सुखावले असतील. शहरात कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प उभे करताना उशीर झाला तरी चालेल मात्र, ठाणे स्थानक परिसर वाहतूक कोंडी मुक्त करा, अशी साधी मागणी येथील रहिवाशांची आहे. नियोजनाचा एकूणच अभाव आणि चिंचोळ्या वाटांमुळे वाहतूक कोंडी टळणार कशी हा प्रश्न कायम असला तरी फेरीवाले, बेकायदा टपऱ्या, दुकानदारांनी पदपथ अडवून मांडलेला संसार यांमुळे हा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत असतो. महापालिकेने ठरवले तर या जाचातून ठाणेकरांची सुटका करणे फारसे आव्हानात्मक नाही. मात्र, चिरीमिरीच्या उद्योगात सापडलेल्या प्रभाग कार्यालयांमधील कोंडाळ्याला याविषयी काहीही देणेघेणे नसते हाच प्रवाशांचा अनुभव आहे. गेल्या दीड-दोन वर्षांत तर येथील अतिक्रमणांचा अक्षरश कहरच झाला होता. आर. ए. राजीव यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार असताना ठाणे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त राहावा, यासाठी त्यांनी जातीने प्रयत्न केले होते. त्यांची बदली झाल्यावर चित्र एकदम पालटले. बिल्डर आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या पलीकडे महापालिका आहे की नाही, असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली. बडय़ा गृह प्रकल्पांना परवानगी देण्यासाठी मुख्यालयात तासन्तास बैठकांचे फड रंगू लागले. हे होत असताना ठाणे स्थानक, फेरीवाले असल्या प्रश्नांकडे पाहायला मुख्यालयात कुणालाही वेळ नव्हता. रेल्वे स्थानक परिसरापासून गोखले मार्गापर्यंत आणि पुढे पाचपाखाडी, उथळसर अशा शहरातील गल्लीबोळांपर्यंत फेरीवाल्यांचे जथ्थे दिसू लागले. गर्दीच्या मार्गावर आठवडय़ाला एखादी तरी नवी टपरी पाहायला मिळे. असीम गुप्ता यांचे अतिक्रमणविरोधी पथक या वाढत्या फेरीवाल्यांकडे अक्षरश डोळेझाक करताना दिसत होता. मुंब्रा आणि बेकायदा वस्त्या, फेरीवाले, टपऱ्या हे समीकरण काही नवे नाही. राजीव यांच्यासारख्या खमक्या आयुक्ताने मात्र मुंब््रयातील पदपथ फेरीवाल्यांपासून मोकळे करून दाखविले होते. गेल्या दीड वर्षांत तेथे पूर्वीपेक्षा अधिक फेरीवाल्यांनी बस्तान बसविल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर संजीव जैयस्वाल यांनी उचललेले पहिले पाऊल काहीसे आश्वासकच म्हणायला हवे. ठाण्यातील रहिवाशांची पहिली गरज रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे तेथे पोहचताना प्रवाशांपुढे अडथळ्यांची शर्यत उभी राहू नये, असा साधकबाधक विचार आयुक्तांनी केला आणि ते स्वत सॅटीसवर अवतरले. सॅटीसखाली जागोजागी बसलेले फेरीवाले, उभ्या राहिलेल्या टपऱ्या, गावदेवी मैदानापर्यंत अतिक्रमणांनी भरलेले पदपथ अशा सगळ्यांची आयुक्तांनी पाहाणी केली. स्थानिक प्रभाग अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. आयुक्तांच्या या दट्टय़ामुळे गेले आठवडाभर येथील पदपथ मोकळे श्वास घेऊ लागले आहे. अगदीच चित्र बदललेले नाही. मात्र, थोडय़ाबहुत प्रमाणात वाहतूक कोंडीही कमी झाली आहे. यामध्ये बरीच सुधारणा होण्यास वाव असला तरी त्यादृष्टीने आश्वासक पाऊल पडल्याने प्रवाशांमध्ये समाधान आहे. हे समाधान किती दिवस टिकेल हाच खरा मोठा प्रश्न आहे. आयुक्तांचे जरासे दुर्लक्ष झाले तरी सॅटीसवर फेरीवाले अवतरतात असा आजवरचा अनुभव आहे. रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण नसावे यासाठी आयुक्तांसारख्या सर्वोच्च पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो यावरून ठाणे महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणा किती पोखरली गेली आहे याचा प्रत्यय येतो. त्यामुळे आपला पहिलाच शहर दौरा काढताना संजीव जैयस्वाल यांनी ठाणेकरांची मनेजिंकण्याचा प्रयत्न केला असला तरी वरकरणी साधे वाटणारे हे आव्हान त्यांना पेलवेल का, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे.
जयेश सामंत