ठाणे : वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने आकृतीबंधला मंजुरी दिल्याने ८८० वाढीव पद भरतीचा मार्ग मोकळा झाला होता. असे असले तरी, अद्याप भरती प्रक्रिया होऊ शकलेली नसून यामुळे शहरातील विकास कामांत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील मंजूर ३०० पैकी १६६ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अभियंत्याना दुहेरी पदाचा ताण सहन करावा लागत असून यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याची चर्चा पालिका वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
ठाणे महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली असून ही ‘ब’ वर्ग महापालिका आहे. ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह ९०८८ तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत. तसेच सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार इतकी आहे. ही लोकसंख्या आता २५ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही वर्षात पालिका क्षेत्राचे विस्तारीकरण झाले आहे. या क्षेत्रात घोडबंदर सारखा परिसर नवे ठाणे म्हणून उदयास आला आहे. मोठ मोठी गृहसंकुले उभी राहत असून घोडबंदर भागात हे प्रमाण मोठे आहे. एकीकडे शहराचे नागरीकरण वाढत असून या नागरिकांना मूलभूत सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे.
सेवानिवृत्तीमुळे पदे रिक्त
वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आकृतीबंधमध्ये ८८० वाढीव पदांना मंजुरी दिली. पण, ही भरती काही कारणास्तव होऊ शकलेली नाही. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळेच पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यानेच सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा दुहेरी ताण वाढला आहे.
अभियंत्यांची पदे रिक्त
ठाणे शहरातील विकास कामात सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता महत्वाची भूमिका बजावतात. शहरात नागरी प्रकल्पांची आखणी करून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अभियंते करतात. पाणी पुरवठा, रस्ते सुस्थितीत ठेवणे, अशी महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. ठाणे महापालिकेत ३०० मंजुर पदांपैकी १६६ पदे रिक्त असून केवळ १३४ पदांवर अभियंते कार्यरत आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता (१) या संवर्गातील मंजुर १२६ पदांपैकी ४६ पदे कार्यरत असून ८० पदे रिक्त आहेत. कनिष्ठ (२) या संवर्गताली मंजुर ६८ पदांपैकी २ पदे कार्यरत असून ६६ पदे रिक्त आहेत.
आरोग्यावर परिणाम
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अभियंत्याना दुहेरी पदाचा ताण सहन करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी एका अभियंत्यांला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यातून ते बचावले. एक अभियंता पाहणी दौऱ्यादरम्यान चक्कर येऊन पडला होता. आणखी एका अभियंत्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला ब्रेनस्ट्रोक झाल्याचे समजते. यानिमित्ताने दुहेरी कामाचा ताण पडत असल्याने अभियंत्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.