ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरणे महापालिका प्रशासनाने बंधनकारक केले असताना हा नियम पायदळी तुडविणाऱ्या अडीच हजार जणांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. गेल्या चार महिन्यांत ही कारवाई करण्यात आली असून विनामुखपट्टी फिरणाऱ्या या नागरिकांकडून १२ लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार ते पाच महिन्यांपूर्वी करोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुखपट्टी वापरण्याच्या सूचना महापालिकेकडून सातत्याने दिल्या जात होत्या. तरीही अनेक जण या सूचनेकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीविनाच फिरत होते. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी विनामुखपट्टी फिरणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईचे अधिकार सहायक आयुक्तांना देण्यात आले होते.

त्यानुसार १२ सप्टेंबरपासून शहरात विनामुखपट्टी फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.  या कारवाईमध्ये गेल्या चार महिन्यांत अडीच हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाई कुठे,  किती जणांवर?

प्रभाग समिती      कारवाई

नौपाडा                   ४६८

वर्तकनगर               ३५४

माजिवडा-मानपाडा ३४९

उथळसर                  २८०

कळवा                     २४५

मुंब्रा                         १८५

लोकमान्यनगर         २४०

वागळे                        १८४

दिवा                          १९५