ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात नागरिकांना चावा घेणारे श्वान पकडून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम करणाऱ्या पशु वैद्यकीय विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. तसेच या विभागाकडून श्वान पकडणे, निर्बिजीकरण, लसीकरण यासाठी वेगवेळ्या निविदा काढल्या जात होत्या. त्यामुळे खासगी संस्थेमार्फत मनुष्यबळ घेऊन त्यांच्यामार्फतच पशुवैद्यकीय विभागाचे संपुर्ण कामकाज करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पालिका आता वेगवेगळ्या निविदा काढण्याऐवजी एकच निविदा काढून संस्थेची नेमणुक करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत पिसाळलेले भटक्या श्वानांना पकडणे तसेच शहरातील श्वानांची संख्या वाढू नये यासाठी निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे, अशी कामे करण्यात येतात. गेल्या १४ वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात ७१ हजार श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ठाणे पालिकेचे वागळे इस्टेट भागात श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. परंतु खासगी संस्थेमार्फत हे काम करण्यात येत होते. परंतु त्यांच्या कंत्राटाची मुदत संपली. यामुळे २०१८ पासून भटक्या श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया बंद होती. यावरून पालिकेवर टिका झाली होती. निर्बीजीकरण प्रक्रिया मार्च २०२२ पासून पुन्हा सुरु करण्यात आली असून आतापर्यंत १३ हजार ५० कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण करण्यात आले आहे.
अपुरे मनुष्यबळ
ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात भटके श्वान पकडण्यासाठी दोन वाहने आहेत. मात्र, ही वाहनेही काहीवेळेस बंद असतात. त्यामुळे तक्रारी येऊनही त्याठिकाणी वाहन पाठविले जात नाही. त्यातच श्वान पकडण्यासाठी ३० ते ४० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना, सध्याच्या घडीला एकही कर्मचारी नाही. त्याचाही फटका श्वान पकडण्याच्या कामाला बसतो आहे. या विभागात अनेक पदे रिक्त असल्यामुळे सध्याच्या घडीला पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सफाई कर्मचारी आणि वाहन चालक एवढेच कर्मचारी कार्यरत आहेत. डॉक्टरांची दोन्ही पदे रिक्त आहेत. तर, पारिचारीकांची ५ ते ६ आणि पशुधन पर्यवेक्षकाची ७ आवश्यकता असून एकही पद भरलेले नाही. त्यामुळे पशु वैद्यकीय विभागाच्या कामात अडथळे निर्माण होत होते.
खासगी संस्थे द्वारे मनुष्यबळ घेणार
नागरिकांना चावा घेणारे श्वान पकडून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम करणाऱ्या पशु वैद्यकीय विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. या विभागाकडून श्वान पकडणे, निर्बिजीकरण, लसीकरण यासाठी वेगवेळ्या निविदा काढल्या जात होत्या. या वेगवेगळ्या निविदांंमुळे कामांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नव्हते. यामुळे खासगी संस्थेमार्फत मनुष्यबळ घेऊन त्यांच्यामार्फतच पशुवैद्यकीय विभागाचे संपुर्ण कामकाज करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ही संस्था श्वान पकडणे, त्यांचे निर्बीजीकरण करणे, त्यांचे लसीकरण करणे आणि त्यांना पुन्हा जेथून आणेल, त्याठिकाणी सोडणे, अशी कामे करणार आहे. या विभागाचे डाॅक्टर आणि पथक या संस्थेच्या कामकाजावर लक्ष ठेवून त्यांच्याकडून संबंधित कामे करून घेणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. या वृत्तास ठाणे महापालिका मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांनी दुजोरा दिला. वागळे इस्टेट भागात श्वान निर्बीजीकरण केंद्रात तळमजल्यावर श्वानांसाठी ८० पिंजऱ्यांची व्यवस्था आहे. तर, पहिल्या मजल्यावर आता मांजरींसाठी २५ पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.