पाच तलावांच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प; खुले प्रेक्षागृह, घाट, विज्ञान उद्यानांची निर्मिती
पुरेशा देखभाल दुरुस्तीअभावी दुर्दशेच्या गर्तेत सापडलेल्या ठाण्यातील प्रमुख तलावांचा कायापालट करण्यासाठी महापालिकेने उशिरा का होईना पुढाकार घेतला असून, शहरातील पाच तलावांभोवती अॅम्पी थिएटर, बनारस घाट, अवकाश विज्ञान उद्यानाची निर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच हाती घेतला जाणार आहे. ठाण्याची ओळख असणाऱ्या मध्यवर्ती मासुंदा तलावात अॅम्पी थिएटरच्या (खुले प्रेक्षागृह) उभारणीसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा प्रकल्प आखण्यात आला असून, राज्य सरकारच्या मदतीवर अवलंबून राहण्याऐवजी स्वत:च्या तिजोरीतून या खर्चाचा भार उचलला जाणार आहे. नाटय़ संमेलनानिमित्त याच तलावात तरंगते व्यासपीठ उभारून दर्जेदार अशा कार्यक्रमांचा नजराणा ठाणेकरांपुढे सादर करण्यात आला होता. अॅम्पी थिएटरमुळे ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एक हक्काचे व्यासपीठ ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे.
तलावांचे शहर अशी ओळख असणाऱ्या ठाण्यातील या नैसर्गिक जलस्रोतांचे पुरेशा देखभालीअभावी गेल्या काही वर्षांत तीनतेरा वाजले आहेत. काही तलाव अतिक्रमणांमुळे बुजले, तर काहींवर जलपर्णीची झालर पसरली. त्यामुळे पर्यावरणप्रेमी ठाणेकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
ठाणे महापालिकेने गेल्या वर्षभरात शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या तलावांच्या सुशोभीकरणाकडे लक्ष पुरविण्यास सुरुवात केली असून येत्या सर्वसाधारण सभेत पाच मोठय़ा तलावांच्या सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलावास एखादे अॅम्पी थिएटर उभारले जावे, अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ही मागणी तातडीने उचलून धरत मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले होते. त्यानुसार महापालिकेने यासंबंधीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला असून सरकारच्या मदतीची वाट न पाहता खासदार निधी आणि महापालिकेच्या तिजोरीतून त्यासाठी खर्च केला जाणार आहे.
उपवन तलावाभोवती ‘बनारस घाट’
येऊर जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य उपवन तलावाचाही कायापालट करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याठिकाणी आर्ट गॅलरी, अॅम्पी थिएटर उभारण्यासाठी दोन कोटी १९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तलावात तरंगता रंगमच तयार केला जातो. हे लक्षात घेऊन येथे नागरिकांच्या बैठक व्यवस्थेसाठी या तलावाभोवती घाट बांधण्यात येणार असून उत्तर भारतीय नागरिकांसाठी छट पूजेसाठी बनारस घाट उभारणीचा प्रकल्पही आखण्यात आला आहे. या दोन मोठय़ा प्रकल्पांसह कावेसर, सिद्धेश्वर, ब्रह्माळा, कोलबाड तलावाचेही सुशोभीकरण केले जाणार आहे. सिद्धेश्वर तलावाभोवती ओपन आर्ट गॅलरी उभारण्यात येणार असून, ब्रह्माळा तलावालगत २५०० चौरस मीटर क्षेत्रात लहानगे अवकाश विज्ञान पार्कची उभारणी केली जाणार आहे.
ठाणे शहरातील प्रत्येक तलावाची स्वतंत्र ओळख आहे. ही ओळख पुनप्र्रस्थापित करणे हा महापालिकेचा हेतू आहे. सर्व तलावांचे टप्प्याटप्प्याने सुशोभीकरण करण्याचा मानस असून मासुंदा, उपवन, सिद्धेश्वर, ब्रह्माळा ही काही प्रातिधिनिक उदाहरणे ठरतील. शिवाय अॅम्पी थिएटर, विज्ञान उद्यानाच्या निर्मितीमुळे ठाणेकरांपुढील पर्यटनाचे दालन विस्तारेल, अशी आशा आहे.
– मोहन कलाल, कार्यकारी अभियंता ठाणे महापालिका