७५ ठिकाणी कंटेनर शौचालयांची उभारणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत शहरातील रस्त्यांचे नुतनीकरण, सुशोभिकरण अशी कामे महापालिकामार्फत गेल्या काही दिवसांपासून सुरु असतानाच, त्यापाठोपाठ आता याच उपक्रमांतर्गत शहरातील नऊशेपैकी सातशे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. राज्य शासन, जिल्हा नियोजन समिती, पालिका अशा ७५ कोटींच्या निधीमधून ही कामे केली जाणार असून या कामांच्या निविदा काढून पालिकेने ठेकेदार निश्चित केल्याने येत्या काही दिवसांत शौचालय दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होणार आहे. याशिवाय, शहरातील झोपडपट्टी वस्त्यांसह महामार्गांलगत ७५ ठिकाणी कंटेनर शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पालिकेने मिशन शौचालय दुरुस्ती हाती घेतल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा पुढील चोवीस तास बंद राहणार

करोना काळापासून जमा व खर्चाचे गणित बिघडल्याने ठाणे महापालिका आर्थिक संकटांचा सामना करीत आहे. शहरातील मोठी विकासकामे करण्यासाठी पालिकेच्या तिजोरीत फारसा निधी शिल्लक नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेला विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून खड्डेमुक्त रस्ते, सुशोभिकरण आणि सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याच्या सुचना मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिकेला केल्या आहेत. सार्वजनिक शौचालयामधूनच रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने त्याच्या सफाईकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना एका कार्यक्रमात बोलताना केल्या होत्या. यातूनच पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत शहरातील रस्त्यांचे नुतनीकरण, सुशोभिकरणापाठोपाठ आता सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील आयरे हरितपट्ट्याला कोपर पश्चिमेतून चोरुन पाणीपुरवठा; बेकायदा वाहिन्यांमुळे रेल्वे रूळाला धोका निर्माण होण्याची भीती

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ९०० सार्वजनिक शौचालये आहेत. या शौचालयांची दुरावस्था झाल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वच शौचालयांची पाहाणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार या विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अनेक शौचालयांची बांधकामे मोडकळीस आल्याचे दिसून आले होते. काही ठिकाणी दरवाजे आणि खिडक्या नव्हत्या, पाणी आणि वीजेची व्यवस्था नाही, अशी बाबही पाहाणी समोर आली होती. या अहवालानंतर नऊशेपैकी सातशे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून कामाच्या निविदा काढल्या होत्या. या निविदांमधून पालिकेने ठेकेदार निश्चित करण्याची प्रक्रीया नुकतीच पुर्ण केली असून यामुळे येत्या काही दिवसांत शौचालय दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होणार आहे.

ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी ७२ कोटीहून अधिक निधी खर्च केला जाणार आहे. त्यात राज्य शासनाचा २५ कोटी, नगरविकास विभागाकडून २५ कोटी, महापालिकेच्या मागासवर्गीय निधीतून १३ कोटी, अण्णाभाऊ साठे योजनेतून ९ कोटी ५० लाख या निधीचा समावेश आहे. या निधीतून काही शौचालयांची किरकोळ तर काही शौचालयांची मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये दरवाजे, खिडक्या, पाण्याच्या टाकी बसविणे, कडी कोंयडा बसविणे, वीजेची सुविधा अशी कामे केली जाणार आहेत.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation decided to repair public toilets amy
First published on: 15-03-2023 at 17:21 IST