ठाणे : ठाणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात बुधवारी घेण्यात आलेल्या सुनावणीस शिंदेची शिवसेना वगळता शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती लावून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना केल्याचा आरोप केला. तर, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनीही काही प्रभागांबाबत हरकती यावेळी नोंदविल्या. विशेष म्हणजे, शिंदेच्या शिवसेनेच्या एकाही नेत्यांने हरकत नोंदविली नाही. यामुळे प्रभाग रचनेवर शिंदेची शिवसेना खुश तर, भाजपसह विरोधी पक्षाचे नेते नाराज असल्याचे चित्र दिसून आले.
ठाणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या २६९ तक्रारींवर बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी व राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीला शिवसेना (उबाठा) नेते राजन विचारे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, मनसे नेते अविनाश जाधव, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०११ सालच्या जनगणनेच्या आधारे २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना तयार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. २०१७ सालानुसार प्रभाग रचना करणार होते तर, त्यात बदल कशासाठी केले, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.
नागरिकांना नागरी सुविधा पुरवताना तसेच विकास कामे करताना अडथळे येऊ नयेत, यासाठी व्यवहार्य पद्धतीने प्रभागांची रचना करावी, अशी अपेक्षा बाळगली जाते. मात्र, प्रगणक गटाची माहिती नाकारून ठामपाने प्रभाग रचना केली आहे, असा आरोप करीत सबंध ठाणे शहराची प्रभाग रचना विशिष्ट राजकीय पक्षाला फायदेशीर केली आहे. त्यामुळे ही रचना बदलावी. तसेच, प्रभाग रचनेबाबत फेरसुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. एकाच प्रभागाचे दोन ते तीन तुकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच प्रभागाचा परिसर दोन ते तीन प्रभाग समिती क्षेत्रात समाविष्ट झाले असून याठिकाणी नागरी हिताची कामे करताना दोन ते तीन प्रभाग समित्यांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. तसेच नागरिकांसाठी हे त्रासदायक आहे. घोडबंदरची पुर्व आणि पश्चिम अशी विभागणी केलेली नाही, अशी हरकत काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मांडली. दरम्यान, प्रगणक गट, लोकसंख्येची गणितीय आकडेवारी, लोकसंख्येची घनता, क्षेत्रफळ आदी मुद्यांवर उत्तरे देताना प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
गावांची विभागणी कशासाठी
कोलशेत गाव हा १६ हजार लोकवस्तीचा गावठाण परिसर आहे. त्याचे विभाजन दोन प्रभागात केले आहे. चेंदणी कोळीवाडा, महागिरी कोळीवाडा, सिद्धार्थनगर, या भागांचेेही विभाजन केले आहे. खाडी भेदून दिव्याचे विभाजन केले आहे. कोकणीपाडा आणि येऊर हे प्रभाग कसे जोडले गेले. असे अनेक प्रश्नांची सरबत्ती लावत जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर आक्षेप नोंदविले. प्रभाग रचना नागरिकांच्या हितासाठी असते, नगरसेवक बनविण्यासाठी नसते. आधी नगरसेवक चोरत होते, आता नगरसेवक संख्या चोरली जात आहे. एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करण्यात आली आहे. ही प्रभाग रचना करताना सर्वाधिक अन्याय हा आदिवासी, दलित- मागासवर्गीय आणि स्थानिक भूमिपुत्रांवर करण्यात आला आहे. दलितबहुल वस्त्यांची विभागणी करून त्यांची लोकसंख्या कमी दाखविण्यात आले आहे. त्यामुळे दलितांना मिळणारे ठाणे पालिकेतील प्रतिनिधीत्व कमी होणार आहे, असा दावा आव्हाड यांनी केला.
सत्ताधारींना मत मिळत नाही म्हणून
प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ठरविताना सरासरी लोकसंख्यच्या १० टक्के जास्त पर्यंत किंवा १० टक्के कमी पर्यंत इतकी लोकसंख्या कमी जास्त करता येते. परंतु ठाणे शहर क्षेत्र आणि दिवा क्षेत्र येथे कमी लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यात आले तर, कळवा आणि मुंब्रा क्षेत्रात जास्त लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यात आले आहे. या प्रकारे कळवा, मुंब्रा क्षेत्रात ४ सदस्यांचा पूर्ण एक प्रभाग चोरण्यात आला आहे. कळवा, मुंब्रा क्षेत्रामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणूकामधून या भागातून नेहमी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मत झालेले आहे. त्यामुळे येथील नगरसेवक संख्या कमी करण्यात आली आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.
संपूर्ण शहराचीच वाट लावली
केवळ एका प्रभागाची नव्हे तर संपूर्ण शहराचीच वाट लावली आहे, असा आरोप करत एका प्रभागाचा विचार करून नका, प्रभागातून बाहेर पडा आणि संपूर्ण शहराचा विचार करा, असे आवाहन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना केला. प्रारूप रचना गणपतीपूर्वी प्रसिद्ध केली आणि सुनावणी गणपतीनंतर ठेवली. त्यामुळे आम्हाला नीट अभ्यास करण्यासाठी वेळच मिळाला नाही. पुढील तारखेला पुन्हा सुनावणी घ्यावी, आम्हाला योग्य संधी द्यावी” अशी मागणी त्यांनी केली.
भाजप, अजित पवार गटाचाही आक्षेप
सुनावणीसाठी आलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांना सभागृहाबाहेरच सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी रोखून धरले होते. यामुळे भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त करताच त्यांना सभागृहात सोडण्यात आले. कोलेशत आणि दिवा गावाचे केलेले विभाजन, हिरानंदानी इस्टेटचे विभाजन, पाचपखाडी प्रभागातील काही भाग दुसऱ्या प्रभाग जोडण्यात आला, याबाबत भाजपचे नेते मनोहर डुम्बरे, नारायण पवार, दत्ता घाडगे यांच्यासह इतरांनी आक्षेप घेतला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी हेमंत वाणी, राजू अन्सारी, संगिता पालेकर यांनी पाचपखाडी आणि मुंब्रा भागातील प्रभाग रचनेबाबत आक्षेप घेतले.
प्रभाग क्रमांक २७,२८,२९ ३२,३३ या पाच प्रभागांची २०१७ च्या तुलनेत लोकसंख्या आणि प्रभाग रचना बदलण्यात आली आहे. अन्य २८ प्रभाग जशातशाच्या आहे. फक्त याच पाच प्रभागांची फेररचना का करण्यात आली. अन्य प्रभागांची मागणी असून का केली नाही, याच्या मागे काय हेतू आहे याचा खुलासा महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावा. अन्यथा नागरिकांच्या मनात संभ्रम आणि या प्रक्रिया बाबत शंका निर्माण होईल, अशी मागणी भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी केली आहे